सहकारी साखर कारखान्यातील व्यवस्थापनाचा प्रदीर्घ अनुभव कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या पाठीशी आहे. साखर उद्योगातील संधी व समस्या याची जाण त्यांना आहे. त्यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीकडे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सोपविल्याने साखर उद्योगातील प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केले.
मांजरी (ता.पुणे) येथे वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या वतीने वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सवरेत्कृष्ट साखर कारखान्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी कल्लाप्पाण्णा आवाडे यांची निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटचे पदाधिकारी, साखर कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.