मांजरी (जि. पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या वतीने दिला जाणारा सवरेत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्यास शनिवारी समारंभपूर्वक देण्यात आला. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आलेला हा पुरस्कार दत्त कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. सा. रे. पाटील यांनी स्वीकारला.
शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्यास गेल्याच महिन्यात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. पाठोपाठ राज्य पातळीवरील आणखी एका पारितोषिकाचा मान या कारखान्यास मिळाला आहे. पुरस्कार स्वीकारताना आमदार पाटील यांच्या समवेत सर्व संचालक, गणपतराव पाटील, कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील यांचा समावेश होता. या कार्यक्रमास सहकारी मंत्री हर्षवर्धन पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे आदींची उपस्थिती होती.