नवी मुंबईमध्ये वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणकडून रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर बसवण्यात आले आहेत, मात्र ग्राहक भरमसाट वीज बिले येत असल्याने हैराण झाले आहेत. लोकप्रतिनिधी आाणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महावितरणच्या कार्यालयावर वाढीव वीज बिलासंदर्भात मोर्चा काढला. परंतु त्यांच्याही पदरी आश्वासनाशिवाय काहीच पडलेले नसल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे.  
महावितरण विद्युत कायद्यानुसार वीजपुरवठा देयकाची रक्कम न भरल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबत नोटीस पाठवली जाते. परंतु त्या नोटीसवरची रक्कम व विद्युत देयकावरची रक्कम वेगळी असते. त्यामुळे वीज ग्राहकांचे विद्युत देयक बघितल्यानंतर डोळे पांढरे होत आहेत. वीज देयक घेऊन ग्राहकांना वीज देयकावरची रक्कम कमी करण्यासाठी महावितरणच्या ऑफिसमध्ये वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. ज्या ठिकाणी रीडिंग पद्धतीचे जुने मीटर बसवण्यात आले आहेत. त्या विद्युत मीटरची रीडिंगही वेळेवर घेण्यात येत नाही. कधी रीडिंग घेण्यात येते तर कधी रीडिंग घेण्यात येत नाही. वीज देयकांवर अनेकदा मीटर फॉल्टी दाखविण्यात येत असल्याची तक्रारही नागरिकांकडून करण्यात येत आहे. वीज ग्राहकांना विद्युत देयकांवरील चुका दुरुस्त करून घेण्यासाठी महावितरण कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत. काही ग्राहकांना तर कामाला सुट्टी घेऊन महावितरणच्या कार्यालयात जावे लागत आहे. यामुळे महावितरणच्या या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
नवीन विद्युत मीटर घेण्यासाठी येत असताना फॉर्ममध्ये जेवढय़ा वस्तू वापरणार आहे  त्यांची माहिती लिहावी लागते. पण रीडिंग कॉम्युटरमधील सिस्टममध्ये टाकली जाते. त्या वेळेला ती माहिती चुकीची आहे असे दाखवली जाते. त्या वेळी अ‍ॅवरेज बिल पाठवले जाते.
शैलेश कांबळे, उपकार्यकारी अभियंता ऐरोली