उरण ते मुंबईदरम्यान वाहतूक कोंडीच्या प्रवासापेक्षा मोरा ते मुंबई जलप्रवासाला प्रवासी अधिक प्राधान्य देत आहे. दररोज हजारो प्रवासी या मार्गाने मोरा जेटी वरून प्रवास करीत आहेत. मात्र मोरा जेटीवर मासळीच्या पाण्यामुळे पसरत असलेल्या दरुगधीचा त्रास येथील प्रवाशांना सहन करावा लागत असून नाक मुठीत घेऊन जेटीवरून प्रवास करावा लागत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत.
मोरा ते मुंबई दरम्यान जलप्रवासासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड प्रवाशांकडून उतारू शुल्क आकारले जाते. यामधून प्रवाशांसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून शौचालय, जेटीची दखरेख तसेच इतर सुविधा पुरविण्याचे काम करावयाचे असते. मोरा जेटीवरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्याच्याकडून लाखो रुपयांचा कर वसूल केला जातो. असे असताना प्रवाशांना कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप वामन तांडेल यांनी केला आहे. सध्या मोरा जेटीवर वाहनांसाठी वाहनतळ नसल्याने अनेक वाहने थेट जेटीवर लावली जात आहेत. त्यामुळे येथील मच्छीमारांना तसेच प्रवाशांनाही त्रास होत आहे. तसेच जेटीवर रात्रीवेळी अनेक पथदिवे बंद पडल्याने अंधारातून चालत जावे लागत आहे. जेटीच्या स्वच्छतेची जबाबदारीही महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडे आहे. मात्र, मासेमारी बोटीतून उतरविण्यात आलेल्या मासळीचे पाणी साचून राहिल्याने त्यातून निर्माण होणारी दरुगधी प्रवाशांना नाहक सहन करावी लागत आहे. याचा त्रास उपचाराकरिता मुंबईत ये-जा करणाऱ्या रुग्णांनाही होत असल्याने मेरीटाइम बोर्डाने जेटी सफाईचे काम करण्याची मागणी येथील प्रवाशांकडून केली जात आहे.