राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस बाबाराव खडसे यांनी उभ्या केलेल्या रिसोड तालुक्यातील मांगवाडी येथील बालाजी सहकारी सूतगिरणीचा उद्घाटन सोहळा माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.  या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, तर प्रमुख अतिथी म्हणून अन्न व औषधे प्रशासन मंत्री मनोहर नाईक, पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत, सहकार राज्यमंत्री प्रकाश सोळुंके यांच्यासह राष्ट्रवादीची नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. सहकाराची चळवळ ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी अनेक वर्षांपासून बाबाराव खडसे यांनी परिश्रम घेतले. बालाजी सहकारी सूतगिरणी अत्याधुनिक सामग्रीने बनविली असून यात अत्यल्प मनुष्यबळ लागणार आहे. शिवाय, परिसरातील नागरिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे रिसोड तालुकाध्यक्ष अंकुश देशमुख यांनी केले आहे.