बाल चित्रकला कलावंतांच्या हृदयावर सन्मानाने आरुढ झालेले नाव म्हणजे बसोली. १५ मे १९७५ सुरू झालेल्या रंगरेषेच्या संवादाची बसोली बालसंवेदना जपताना पाहता पाहता ४० वर्षांची झाली. बसोली हे नाव आता केवळ संस्थेचे विशेष नाम राहिलेले नसून ते आता एका शैलीचे परंपरेचे आणि चळवळीचे झाले आहे. एक ध्येय उराशी बाळगून त्याच वाटेने सातत्याने वाटचाल करणे तेवढे सोपे नाही. ते करीत असताना लहानग्या झुळझुळणाऱ्या ओढय़ांचे रूपांतर विशाल प्रवाहात झाले हे कळलेच नाही.
बसोलीच्या शिबिरात येणारी मुले ही समाजाच्या सर्वच स्तरातील असतात. या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी असा भेदभाव कधीच नसतो. सर्वच मुले एकतेच्या भावनेने राहून विविध कलांचे ज्ञान आत्मसात करतात. एकमेकांच्या सुख दुखात समरस होतात. सप्तकलांच्या माध्यमातून या शिबिराची सत्रे राबविली जात असताना गीत चित्रे, शिल्प, नाटय़ मातीकाम, क्राफ्ट क्ले मॉडेलिंग, अभिनय अशी कितीतरी सत्रांतून बालमनांचा वेध घेऊन बालकलावंतांच्या अद्भूत कल्पना विश्वाचा जिवंत प्रत्यय शिबिरात पाहावयास मिळतो. बसोलीच्या माध्यमातून होणाऱ्या शिबिरातून बाहेर पडणारे छैलछैबिले एक ध्येय घेऊन बाहेर पडतात आणि समाजात स्वतचे वेगळेपण सिद्ध करतात. गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात शिबिराची लाट असताना त्यात बसोलीने मात्र वेगळेपण जपले आहे. केवळ व्यावसायिकता न ठेवता बालमनावर कलेचे आणि संस्काराचे बीज पेरण्याचे काम बसोली करीत आहे. बालमनावर कलेच्या माध्यमातून चांगले संस्कार व्हावे ही भावना ठेवून ज्येष्ठ चित्रकार चंद्रकात चन्ने यांनी लावलेल्या या रोपटय़ाचे वटवृक्षात रूपांतर झाले. बसोली या नावाचा सामानार्थी शब्द म्हणजे चंद्रकात चन्ने असून एखाद्या व्रताप्रमाणे गेल्या चाळीस वर्षांपासून लहानग्याच्या अभिव्यक्तीचे कौतुक करीत असताना त्यांच्यावर संस्कार केले जात आहेत. जागतिक दर्जाच्या चित्रकारांशी त्यांची तोंडओळख करून दिली. चित्रे कशी काढावीत हे बसोली शिकवित नाही पण चित्रकलेचे मर्म मुलांच्या मनावर सूक्ष्मपणे बसोली ठसविते. बसोली हे शिबीर नसून ती एक चळवळ आहे. या चळवळीतून किमान दोन पिढय़ा बाहेर पडल्या आहेत. या दोन पिढय़ाचे भाग्यविधाते म्हणून बसोलीच्या चाळिशीला सलाम.
बसोली ग्रुपचा वर्धापन दिन सोहळा उद्या गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता लक्ष्मीनगरातील आठ रस्ता चौकातील सायंटिफीक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे (अभिमत विद्यापीठ) मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा आणि मुंडले एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकरराव मुंडले उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून बसोलीच्या रंग, रेषा, आकाराची लय घेऊन कला क्षेत्रात आपल्या विशिष्ट संवादाने ठसा उमटविणाऱ्या दहा कला व्यावसायिक बसोलीकरांचा गौरव करण्यात येणार आहे. यात ग्राफीक डिझायनर विवेक रानडे, संगीतकार राजेश ढाबरे, प्राॉडक्शन डिझायनर रजनीश हेडाऊ, नेपथ्यकार संजय काशिकर, साऊंड इंजिनियर स्वरूप जोशी, लेखक व दिग्दर्शक अभिजित गुरू, डिझायनिंग अॅन्ड ब्रॅडिंग प्रोफेशनल महेंद्र पेंढारकर, सिने नाटय़ कलावंत मुकंद वसुले, ऐरो मॉडेलिंग इंन्स्ट्रक्टर राजेश जोशी आणि हिमांशू खोरगडे यांचा समावेश आहे. बसोली प्रेमींनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्रमुख चंद्रकात चन्न्ो यांनी केले आहे.