मेयो रुग्णालयात रुग्णांना ने आण करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर बॅटरी ऑपरेटर व्हेईकल नावाचे नवीन यंत्र आणण्याचा निर्णय मेयो प्रशासनाने घेतला मात्र, मार्च महिना उलटला तरी पुरवठादाराने निविदा भरली नसल्याने यंत्राची प्रक्रिया रखडल्याची माहिती समोर आली आहे.
वाढत्या लोकसंख्येप्रमाणे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मेयोतील रिक्त पदे भरणे गरजेचे असताना शासन मात्र पदभरती बाबत उदासीन आहे. रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात मात्र सेवा देणाऱ्या हातांची रुग्णालयात कमतरता असल्यामुळे रुग्णांना त्याचा मानसिक त्रास करावा लागतो. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या फारच कमी असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण पडतो आहे. रुग्णाला व्हीलचेअरवरून वार्डात नेतांना त्यामागे एक कर्मचारी लागतो आणि तेवढा वेळ जातो. कर्मचारी कमी असल्याने रुग्णाला घेऊन जाण्यास अटेंडन्ट उपलब्ध राहत नाही. नातेवाईकांना रुग्णांला वार्डात ने आण करावी लागत आहे. यावर उपाय म्हणून मेयो प्रशासनाने गेल्यावर्षी बॅटरी ऑपरेटर व्हेईकलचा नवीन पर्याय शोधून काढला. प्रशासनाने शासनाला त्या संदर्भात प्रस्ताव पाठविल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली. बॅटरी ऑपरेटर व्हेईकलची ई निविदा काढली. या यंत्राची किंमत १५ लाख असून २०१४ च्या प्रारंभी ते उपलब्ध होईल असे मेयोचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे यांनी सांगितले होते. मात्र वर्षभरापूर्वी ई निविदा काढली असताना पुरवठादाराने टेंडरच भरले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे वर्ष उलटले तरी व्हेईकल रुग्णांच्या सेवेत दाखल झाले नाही. या संदर्भात मेयो प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असताना पुरवठादाराच्या घोळामुळे व्हेईकल येण्यास उशीर होत असल्याचे सांगण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकार रुग्णालयासाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून देत असताना रुग्णालय प्रशासन मात्र त्याबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.