जमावबंदीचा आदेश झुगारून आयआरबी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी ९ नगरसेवकांविरुद्ध गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यापकी ८ नगरसेवकांना आज गांधीनगर पोलिसांनी आज अटक केली.
स्थायी सभापती सचिन चव्हाण, काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादी गटनेते राजू लाटकर, नगरसेवक प्रा. डॉ. जयंत पाटील, प्रकाश गवंडी, मधुकर रामाणे, रमेश पोवार माजी नगरसेवक अजित राऊत आदी नगरसेवकांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. तर नगरसेवक सत्यजित कदम यांच्या विरुद्धही गांधीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी महापालिकेला व जिल्हा पोलीस अधीक्षकांना आयआरबीकडून टोलवसुली पूर्ववत सुरू करण्यासंबंधीचे पत्र प्राप्त झाले. सोमवारी दिवसभर आयआरबीने टोलवसुलीबाबत जय्यद तयारी सुरू केली होती. त्यामुळे काल दिवसभर शहरातील वातावरण तंग होते. महापालिकेत ही बातमी समजल्यावर महापालिकेतून ही बातमी टोलविरोधी कृती समितीला समजली. टोलविरोधी कृती समिती व नगरसेवक दिवसभर आयआरबीच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. संतप्त नगरसेवकांनी व कृती समितीने रात्री सुरुवातीला शिरोली टोल नाक्याची पाहणी केली. त्यानंतर उचगाव टोल नाक्यावर टोलवसुलीच्या तयारीत असणाऱ्या आयआरबीच्या कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत नगरसेवकांनी त्यांना मारहाण करून पिटाळले. यानंतर उचगाव येथील श्रीराम कॉलनीत जाधव यांच्या घरी आयआरबीचे आणखी कर्मचारी राहात असल्याची माहिती नगरसेवकांना मिळाली. ही माहिती मिळताच नगरसेवकांनी आपला मोर्चा तिकडे वळवला. येथील आयआरबीच्या कर्मचाऱ्यांना चोप देत तेथून पिटाळून लावले. त्यानंतर शहरातील शाहू, आर. के. नगर, कळंबा, शिये, चंबूखडी, फुलेवाडी या नाक्यांची पाहणी केली. मध्यरात्री दोनच्या सुमारास जाधव यांच्या घरामागील एक दुचाकी जाळून घरावर दगडफेक करून ४५ हजारांचे नुकसान करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, बेकायदेशीर जमाव करून बंदी आदेशाचा भंग करणे आदी गुन्हे नगरसेवकांवर लावण्यात आले होते. याप्रकरणी त्यांना आज अटक करून न्यायालयात हजर केले.
दरम्यान, राजू लाटकर व शारंगधर देशमुख यांनी महापालिकेने कंपनीस टोलवसुली थांबवण्यास सांगितले असतानाही कंपनीने टोलवसुलीचे प्रयत्न चालवले होते. म्हणून पोलिसांसमोरच त्याला ताकीद दिली. टोल आम्ही कदापि घेऊ देणार नाही. कोल्हापूरचे दोन्ही मंत्री टोलबाबत निर्णय घेत असताना आयआरबी कंपनीने टोलवसुलीचा प्रयत्न करणे चुकीचे असल्याचे सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2014 रोजी प्रकाशित
‘आयआरबी’ कर्मचा-यांना मारहाण; ९ नगरसेवकांविरुद्ध गुन्हा, अटक
जमावबंदीचा आदेश झुगारून आयआरबी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी ९ नगरसेवकांविरुद्ध गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यापकी ८ नगरसेवकांना आज गांधीनगर पोलिसांनी आज अटक केली.
First published on: 29-01-2014 at 03:20 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beaten irb employees crime against 9 corporators arrested