राज्य व केंद्र सरकारची कुठलीही आर्थिक मदत न घेता या तालुक्यातील डोंगरखंडाळा हे गाव विकास व प्रगतीने स्वयंपूर्ण करण्याचा दृढनिर्धार बुलढाणा अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उर्फ भाईजींनी केला आहे. डोंगरखंडाळा त्यांची जन्मभूमी आहे. या मातृभूमीचे नंदनवन करण्यासाठी आर्थिक, सामाजिक व भौतिक विकासाचे विविध उपक्रम डोंगरखंडाळात राबविले जाणार आहेत. पहिल्या टप्यात गावांच्या सोयीसुविधांकरिता बुलढाणा अर्बनच्या व्यापारी नफयातून गावाला दोन क ोटी रुपये विकास निधी प्रदान केला जाणार आहे. संपूर्ण देशातील आदर्श, स्वयंपूर्ण व सुंदर गाव, अशी त्यांची संकल्पना आहे. त्यासाठीच्या कृतिकार्यक्रमांना त्यांनी प्रारंभ केला आहे.
महाराष्ट्रातील विजयसिंह मोहिते पाटील यांचे अकलूज, पोपटराव पवार यांचे हिवरेबाजार, अण्णा हजारे यांचे राळेगण सिध्दी, शरद पवारांचे बारामती या गावांप्रमाणेच डोंगरखंडाळाचा विकास व्हावा, अशी त्यांची अनेक वर्षांपासून इच्छा आहे.
त्यांचे वडील सेठ देवकिसनजी चांडक यांची जन्मभूमी व कर्मभूमीही डोंगरखंडाळा! या गावचे जमीनदार आणि दानशूर म्हणून ते अतिशय लोकप्रिय होते. तेथून जवळच डोंगरशेवली येथील श्रीक्षेत्र सोमनाथ महाराजांवर त्यांची नितांत श्रध्दा होती. या संस्कारांचा वसा घेतलेल्या भाईजींनी देशातील पहिल्या क्रमांकाची २ हजार १०० क ोटी रुपयांच्या ठेवी असलेली बुलढाणा अर्बन ही महत्त्वाकांक्षी पतसंस्था उभारली. या पतसंस्थेच्या आज २९० शाखा आहेत.
भाईजी परदेशात असले तरी त्यांचे लक्ष डोंगरखंडाळ्याकडे असते. त्यांनी या गावच्या प्रत्येक घरातील एका माणसाला रोजगार देण्याचा प्रयत्न केला आहे.
गावातील पात्र व गरजू १८० बेरोजगार बुलढाणा अर्बन परिवारात विविध पदांवर काम करतात. त्यांनी डोंगरखंडाळा येथे बुलढाणा अर्बन सिडस्, पणन प्रक्रिया, गोदाम पावती योजना हे उपक्रम सुरू केले आहेत. शेतकऱ्यांसाठी पाणलोट विकास व शेततळ्यासाठी अतिशय माफक दरात जेसीबी व यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गावात १० हजार झाडे लावण्याचा संकल्प करून ५ हजार झाडे लावण्यातही आली आहेत. संपूर्ण गाव शौचालययुक्त, स्वच्छ व सुंदर करण्यात येत आहे. गावात सुलभ शौचालयासाठी संस्थेतर्फे २ हजार रुपये अनुदान देण्यात येते. त्याचा सुमारे २०० लोकांना लाभ देण्यात आला आहे.
परिसरातील सुमारे १०० शाळकरी मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. सुमारे २ क ोटी रुपयांच्या विकास योजनातून गावात सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते, नाल्या बांधकाम व सांडपाणी व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
गावाला चोवीस तास स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेला पुरक अशा योजना तसेच
 गावात पाणलोट व जलसंधारणाचे व्यापक प्रकल्प हाती घेतले जाणार आहे. शेतीपुरक उद्योगधंद्यांना चालना देऊन प्रक्रिया उद्योग
वाढविले जाणार आहे. स्वच्छ सुंदर पर्यावरणपूरक गाव, उद्योगधंदे व रोजगारांनी परिपूर्ण गाव, शिक्षणाच्या सुविधा असलेले गाव, आदर्श आणि  स्वयंपूर्ण गाव या सर्व कल्पना प्रत्यक्षात साकार होणार आहेत.