पर्यावरणक्षेत्रात अनेक संस्था, व्यक्ती आपापल्या परीने काम करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रयत्न भामला फाउंडेशनच्या माध्यमातून गेली पाच वष्रे सुरू आहे. कचऱ्याच्या विल्हेवाटीपासून सुरू झालेल्या या मोहिमेला आता मुंबईभरात घेऊन जाण्यासाठी फाउंडेशन सिद्ध झाले आहे. या कामात अनेक सेलिब्रेटींनीही संस्थेला मदत देऊ केली. याबाबत सांगताहेत भामला फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष आसिफ भामला..
* गेली अनेक वष्रे सामाजिक क्षेत्रात काम करतानाच पर्यावरणाच्या जतनाकडे कसे वळलात?
वेगवेगळ्या पातळ्यांवर अत्याधुनिक साधनसामग्रीचा विकास होत असताना व त्याचा वापर वाढलेला असताना पर्यावरणासारख्या मूलभूत विषयाकडे लक्ष देणे गरजेचे वाटले. भामला फाउंडेशन गेली १८ वष्रे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. गतिमंद, सेलिब्रल पाल्सी असलेल्या मुलांसंदर्भात संस्थेचे भरीव काम आहे. पाच वर्षांपूर्वी फाउंडेशनने पर्यावरणाच्या मोहिमेत काम करण्यास सुरुवात झाली. स्वच्छतेचा व पर्यावरणाचा नजीकचा संबंध लक्षात घेऊन ‘क्लीन ग्रीन ड्राइव्ह’ने पर्यावरणाच्या संरक्षणाचे काम हाती घेण्यात आले. पुनर्वकिासासाठी, विविध कारणांसाठी झाडे तोडणाऱ्या, त्यांना इंजेक्शन देऊन मारणाऱ्यांविरोधातही संस्थेने पुढाकार घेतला आहे.
* ओला व सुका कचरा वर्गीकरणाच्या तुमच्या मोहिमेला आता गती मिळत आहे..
वांद्रे, खार, सांताक्रूझ या उपनगरांमध्ये कचऱ्याच्या पर्यावरणसुसंगत विल्हेवाटीसाठी सुरू झालेली मोहीम संपूर्ण शहरात राबवण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत. या ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण आणि ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी अ‍ॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटची (एएलएम) मदत घेण्यात आली. लोकांचा सहभाग असल्याशिवाय ही मोहीम यशस्वी होऊ शकत नाही. एच पश्चिम विभागाच्या पालिका शाळांमध्येही ओला व सुका कचरा वर्गीकरण व कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात आला. या ठिकाणच्या मदानातील कचऱ्याचीही तिथल्या तिथेच विल्हेवाट लावली जाते. याशिवाय या भागातील एएलएमच्या माध्यमातून अनेक निवासी संस्थांमधून कचरा विल्हेवाटीसाठी सुरुवात झाली आहे. परिसरातील तज्ज्ञ रहिवासी या कामात फाउंडेशनच्या संपर्कात आहेत. लोकसहभागाच्या जोडीनेच पालिका व राज्य सरकारकडूनही या सामाजिक कार्यासाठी पािठबा मिळत आहे.
* युवकांचा पर्यावरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे?
स्थानिकांच्या सहकार्याने व सहभागातून होत असलेल्या या कामात अधिकाधिक युवक येत आहेत. भविष्यात पर्यावरणासंबंधित उभ्या राहणाऱ्या समस्या आपल्यालाच भेडसावणार असल्याची कल्पना युवकांना आहे. सोशल नेटवìकग साइटमुळे या विषयावर चर्चा सुरू असते. त्यातूनच अधिकाधिक युवकांना पर्यावरणासंबंधी काम करण्याची इच्छा होते. भामला फाउंडेशनमार्फत या कामाला व्यासपीठ मिळवून दिले जाते. त्यामुळे १८ ते २२ वष्रे वयोगटातील युवकांचे अनेक गट फाउंडेशनशी जोडले गेले आहेत.
* शाळांना या चळवळीत कसे जोडण्यात आले?
मुलेच राष्ट्राचे भवितव्य घडवू शकतात. उद्याचा सुजाण नागरिक घडविण्यासाठी मुलांना पर्यावरणाशी आताच जोडून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे दरवर्षी आम्ही शाळांमधील चाललेल्या पर्यावरणपूरक बाबींचा आढावा घेऊन त्यातील तीन शाळांचा गौरव करतो. दर तीन महिन्यांनी शाळांमधील कामांची पाहणी केली जाते. शाळेच्या आवारातील झाडांची संख्या नोंदणे, वृक्षलागवड करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, हिवताप-डेंग्यूच्या डासांचा अटकाव करणे, विजेचा कमी वापर अशा अनेक निकषांवर शाळांची निवड केली जाते. शाळांसोबतच पर्यावरण क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या दोन व्यक्तींनाही ५ जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त कार्टर रोड येथील समारंभात होणाऱ्या कार्यक्रमात गौरविले जाणार आहे.  
* भामला फाउंडेशनकडून पर्यावरण दिन कसा साजरा केला जातो?
गेली पाच वष्रे आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहोत. हा दिवस म्हणजे एक प्रकारे आपल्या पृथ्वीचा वाढदिवसच असतो. पृथ्वी आपल्याला देत असलेल्या साधनसंपत्तीबाबत आदर व्यक्त करण्याचा हा दिवस. त्यामुळेच संगीत, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील सेलिब्रेटीजना बोलावून हा दिवस प्रतीकात्मक पद्धतीने साजरा केला जातो. यावेळीही कार्टर रोड येथे अनेक सेलिब्रेटींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. यावेळी संगीत, नाटय़, कला अशा विविध माध्यमातून पर्यावरणाचा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचवला जाईल.
* पर्यावरण चळवळींमध्ये सेलिब्रेटींच्या सहभागाने प्रभाव पडतो का?
पर्यावरणदिनी होत असलेले कार्यक्रम हे केवळ संदेशरूपात राहणार नाहीत, याची आम्ही खबरदारी घेतो. विविध क्षेत्रातील सेलिब्रेटीही आपापल्या कलेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पर्यावरणाचा संदेश घेऊन जातात. सेलिब्रेटी हा समाजासमोरचा एक आदर्श असतो. त्यामुळे त्यांनी दिलेला संदेश अधिक प्रभावी ठरतो. सचिन तेंडुलकरने पाणी वाचविण्यासाठी वैयक्तिक पातळीवर करीत असलेले प्रयत्न आमच्या संस्थेच्या व्यासपीठावरून सांगितले तेव्हा उपस्थितांवर त्याचा झालेला परिणाम खूप मोठा होता. यावेळीही अनेक क्षेत्रातील सेलिब्रेटी, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते, तसेच प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.  सेलिब्रेंटींसह राजकीय नेत्यांकडूनही आम्हाला नेहमीच पािठबा मिळतो. पर्यावरणाच्या कामासाठी माजी पर्यावरणमंत्री सचिन अहिर यांनी सक्रिय पािठबा दिला होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही या कामात सहकार्य करते. संस्थेकडून गौरविण्यात आलेल्या व्यक्तींना राज्य सरकारकडूनही प्रमाणपत्र देण्यात आले होते. यावेळीही खासदार पूनम महाजन यांनी या मोहिमेसाठी पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
* भविष्यात ही चळवळ कशा पद्धतीने पुढे नेण्याची योजना आहे?
‘क्लीन ग्रीन ड्राइव्ह’ने सुरुवात झालेल्या या चळवळीतून पर्यावरणासंबंधित अधिकाधिक पलूंबाबत कृती केली जाणार आहे. कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सगळ्यांनी एकत्र येऊन ‘हरित आणि स्वच्छ मुंबई’ची निर्मिती करायला हवी. त्यासाठीच काही उपनगरात सुरू झालेली ही मोहीम संपूर्ण मुंबईभर व नंतर राज्यभरात पोहोचवण्याचा विचार आहे.