जिल्हय़ात गटसचिव म्हणून काम करणाऱ्या १८२ जणांचे १ हजार ५५२ वेतनांची रक्कम प्रलंबित आहे. वेतन न मिळाल्याने हलाखीचे आयुष्य जगणाऱ्या गटसचिवांनी रविवारी शहरात भीक मागून आंदोलन केले. या आंदोलनातून ५२३ रुपयांची भीक गोळा झाली. ही रक्कम राज्याच्या सहकार विभागाचे प्रधान सचिव यांना धनादेशाद्वारे दिली जाणार आहे. महाराष्ट्र सहकारी गटसचिव व कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनातील कर्मचाऱ्यांनी वेतन न मिळाल्याने होणारे हाल आंदोलनाच्या माध्यमातून मांडले.
गटसचिवांच्या वेतनविषयक प्रश्नावर मुंबई येथे मोर्चा काढून मागण्या सादर केल्या होत्या. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लेखी आश्वासन देऊन प्रश्न निकाली काढले जातील, असे म्हटले होते. या घटनेला आता २० महिने होत आहेत. राज्यात गेल्या तीन-चार महिन्यांपासून सहकार मेळावे घेतले जात आहेत. खेडय़ापाडय़ात खऱ्या अर्थाने सहकारचे वातावरण निर्माण करणाऱ्या गटसचिवांच्या प्रश्नाकडे कोणीच लक्ष दिले नाही. वेतन नसल्याने या वर्षी कर्मचाऱ्यांनी दिवाळीदेखील साजरी केली नाही. या प्रश्नावर नेमलेल्या समित्यांचा फारसा उपयोग झाला नाही. महागाईच्या काळात उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता वेतन मिळाले नाहीतर भीक मागण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी भूमिका आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. औरंगाबाद येथे होणाऱ्या सहकार मेळाव्याच्या निमित्ताने या प्रश्नावर चर्चा व्हावी, अशी गटसचिव संघटनेची मागणी आहे. आज करण्यात आलेल्या आंदोलनात संघटनेचे राज्य सरचिटणीस रवींद्र काळे, बाळू बावीकर, संजय देसले, किशोर तांदळे, रवींद्र देवरे आदी सहभागी झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Dec 2013 रोजी प्रकाशित
गटसचिवांचे भीक मागो आंदोलन; आंदोलनातील रक्कम सरकार दरबारी
जिल्हय़ात गटसचिव म्हणून काम करणाऱ्या १८२ जणांचे १ हजार ५५२ वेतनांची रक्कम प्रलंबित आहे. वेतन न मिळाल्याने हलाखीचे आयुष्य जगणाऱ्या गटसचिवांनी रविवारी शहरात भीक मागून आंदोलन केले.
First published on: 02-12-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhik mago agitation of group secretary cash credit to government in agitation