जिल्हा क्रीडा संकुलासाठी तत्वत: मान्यता मिळालेल्या येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर पुढील महिन्यात एका महानाटय़ाच्या आयोजनाचा घाट घातला जात असून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने त्यासाठी अनुकूलता दर्शविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केल्यावर या महानाटय़ाचे प्रयोग रंगणार आहेत. दरम्यान, या प्रयोगांमुळे दहा दिवस स्टेडियममध्ये नियमित होणाऱ्या खेळांच्या सरावावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. याआधीच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी बदलविलेला स्टेडियमचा चेहरामोहरा या प्रयोगांमुळे पुन्हा ‘जैसे थे’ होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
शहराच्या मध्यवर्ती असलेले छत्रपती शिवाजी स्टेडियम त्याच्या बांधकामापासूनच सदैव वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त राहिले आहे. जिल्हा परिषदेने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे मैदान शिक्षण खाते ताब्यात घेत असल्याचे निमित्त करून १९८२ च्या सुमारास ताब्यात घेतले होते. त्यांचा खरा हेतू येथे दुकाने बांधून मैदानाचा व्यापारी उपयोग करण्याचा होता. त्यास विरोध करण्यासाठी १९८५ च्या सुमारास नाशिकमधील क्रीडाप्रेमी जनतेने एकत्र येऊन आंदोलन केले. जनता उच्च न्यायालयातही गेली. जिल्हा परिषदेचे ५५ टक्के बांधकाम कमी करण्याचा निकाल न्यायालयाने दिला. परंतु महापालिकेच्या धरसोड वृत्तीमुळे मैदान जिल्हा परिषदेकडेच राहिले. १९८६ च्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे जिल्हा परिषदेने काहीही केले नसल्याचा आरोप क्रीडांगण बचाव समितीचे सचिव तथा नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशनचे सचिव रत्नाकर पटवर्धन यांनी याआधी केला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून स्टेडियम जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या ताब्यात घेण्याचे सोपस्कार पार पडल्यानंतरही स्टेडियमच्या काही भागाचा वाहनतळ म्हणून वापर करण्याचा प्रयोगही दोन वर्षांपूर्वी रंगला. स्टेडियमचा पूर्णपणे वापर होत नाही तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाहीत, असे लक्षात घेत तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी सुधीर मोरे यांनी स्टेडियमचे चित्र बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे साधारणत: वर्षांपूर्वी स्टेडियमने कात टाकली. याआधी स्टेडियमच्या अवस्थेला नाक मुरडून जवळील यशवंत व्यायामशाळेत जाणारी मंडळीही स्टेडियमचे नवे रूप पाहून परत वळली. क्रीडापटूंची वर्दळ वाढल्याने स्टेडियममध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना पायबंद बसण्यास मदत झाली. स्टेडियमच्या प्रवेशव्दारावर सुरक्षारक्षक दिसू लागला. अंधारात बुडणाऱ्या स्टेडियमवर प्रकाशझोत पडला. जिल्हा क्रीडा संकुल स्टेडियममध्ये होण्यासाठी प्रस्तावही पाठविण्यात आला. अशी सर्व पाश्र्वभूमी असताना डिसेंबरच्या पूर्वार्धात दहा दिवसांसाठी स्टेडियम एका महानाटय़ासाठी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्टेडियममध्ये नियमित सराव करणाऱ्या खो-खो आणि फुटबॉलपटूंना या दहा दिवसात अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. स्टेडियमलगत होणाऱ्या व्हॉलीबॉलच्या सरावावरही या महानाटय़ासाठी होणाऱ्या वाहन तळाचा त्रास होऊ शकतो. या महानाटय़ास परवानगी देण्याविषयीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढय़ात असून ते काय निर्णय घेतात हे पाहाणे महत्वबूर्ण ठरणार आहे.
स्टेडियमच्या देखभालीसाठी निधीची गरज
छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये जिल्हा क्रीडा संकुलास तत्वत: मान्यता मिळाली असल्याने बऱ्याच गोष्टी साध्य करणे शक्य आहे. स्टेडियमचा डोलारा मोठा असल्याने आणि सध्या सर्व क्रीडा स्पर्धाचा हंगाम संपला असल्याने स्टेडियमला आर्थिक मदत होण्याच्या दृष्टीने महानाटय़ासारख्या प्रयोगांना परवानगी दिली तर काय बिघडले ? बाहेरील व्हॉलीबॉलचे केंद्र स्टेडियममध्ये आणण्यात येणार असून क्रिकेटच्या नेट प्रॅक्टिसचीही व्यवस्था एकीकडे करण्यात येणार आहे.
संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2013 रोजी प्रकाशित
शिवाजी स्टेडियममध्ये पुन्हा महानाटय़ाचा घाट
जिल्हा क्रीडा संकुलासाठी तत्वत: मान्यता मिळालेल्या येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर पुढील महिन्यात एका महानाटय़ाच्या आयोजनाचा घाट घातला जात
First published on: 19-11-2013 at 07:09 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big drama arreanged on shivaji stadium