भावी पत्नीला भेटण्यासाठी मित्रासोबत निघालेल्या लष्करी जवानाची मोटारसायकल औंध पोस्ट कार्यालयासमोर रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.
अमोल ज्ञानेश थोरात (वय २८, रा. थेरगाव) व संदीप गंगाधर वासकीन (वय २९, रा. आसरा, जि. अमरावती) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  अमोल हा भावी पत्नीला भेटण्यासाठी तो व त्याचा मित्र संदीप हे सोमवारी रात्री मोटारसायकलवरून औंधमार्गे रक्षक चौकाकडे जात होते. अमोल हा मोटारसायकल चालवत  होता. औंध पोस्ट कार्यालयासमोर रात्री आठच्या सुमारास रस्ता दुभाजकाला त्यांची भरधाव मोटारसायकल धडकल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचाराच्या अगोदरच मृत्यू झाला. अमोल हा लष्करी जवान असून तो जम्मू येथे पोस्टिंगला होता. काही दिवसांपूर्वी थेरगावला सुट्टीसाठी आला होता. त्याचे पुढील महिन्यात लग्न ठरले होते. संदीप हा त्याचा मित्र असून तो आपल्या भावाकडे आला होता. तो अमरावतीला एका खासगी कंपनीत कामाला होता. याप्रकरणी फौजदार जे. एस. राजेशिर्के या अधिक तपास करत आहेत.