नंदुरबार जिल्ह्यत भाजप, काँग्रेसला समान यश; राष्ट्रवादीला भोपळा

नंदुरबार जिल्ह्य़ात भाजपने आपले खाते कायम राखत तब्बल दोन मतदारसंघातून विजय प्राप्त केला आहे. तर काँग्रेसलाही दोन मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आले आहे.

नंदुरबार जिल्ह्य़ात भाजपने आपले खाते कायम राखत तब्बल दोन मतदारसंघातून विजय प्राप्त केला आहे. तर काँग्रेसलाही दोन मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. जिल्ह्य़ातून राष्ट्रवादीचा पूर्णपणे सफाया झाला. डॉ. विजयकुमार गावित, के. सी. पाडवी यांनी आपआपल्या मतदारसंघातून विजयी घौडदौड कायम ठेवली असून, माजी मंत्री सुरूपसिंग नाईकांनी जोरदार पुनरागमन केले आहे. तर शहाद्यातून पालकमंत्री तथा माजी क्रीडामंत्री पदमाकर वळवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
जिल्ह्य़ातील अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर मतदारसंघाच्या मतमोजणीत ंअनेक धक्कादायक निकाल पहावयास मिळाले. जागावाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत कळीचा मुद्दा ठरलेल्या नवापूर मतदार संघात गांधी घराण्याचे निकटवर्तीय माजीमंत्री सुरूपसिंग नाईक यांनी राष्ट्रवादीचे शरद गावित यांचा २१८१७ मतांनी पराभव केला. सुरूपसिंग नाईकांना ९३७९६ तर शरद गावितांना ७१९७९ मते पडली. डॉ. विजयकुमार गावितांचे धाकटे बंधू असलेल्या शरद गावितांवरच जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीची संपूर्ण भिस्त होती. मात्र त्याच्या पराभवाने राष्ट्रवादीला जिल्ह्य़ात जोरदार हादरा बसला आहे.
दुसरीकडे सर्वाधिक धक्कादायक निकाल शहादा मतदारसंघात लागला. या ठिकाणाहून काँग्रेसचे माजी क्रीडामंत्री तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री पद्माकर वळवींना पराभवास सामोरे जावे लागले आहे. येथे त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजपच्या उदेसिंग पाडवींनी अवघ्या ७१९ मतांच्या निसटत्या फरकांने पराभव केला. उदेसिंग पाडवींना ५८५५६ तर पद्माकर वळवींना ५७७४१ मते मिळाली. याच मतदारसंघात शिवसेनेतून रात्रीतून कोलांटी उडी घेत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या जितेंद्र गावितांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. त्यांना ४७९६६ मते मिळाली आहेत.
नंदुरबार मतदार संघातून अपेक्षेप्रमाणे डॉ. विजयकुमार गावितांनी विजय मिळवत काँग्रेसच्या कुणाल वसावेंचा पराभव केला. काँग्रेसने याठिकाणी संपूर्ण राजकीय ताकद झोकल्याने खरेतर डॉ. गावितांसाठी निवडणूक अवघड मानली जात होती. मात्र डॉ. गोवितांनी २७११८ मताधिक्याने संपादित केलेला विजय मतदारांचा त्यांच्यावर असलेल्या विश्वासाची पावती मानला जात आहे. डॉ. विजयकुमार गावितांना १०१३२८ तर कुणाल वसावेंना ७४२१० मते मिळाली. अक्कलकुवा मतदारसंघातून के. सी. पाडवी यांनी सलग सहाव्यांदा आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. याच मतदारसंघात पंचरंगी लढत पहावयास मिळाली होती. मात्र राजकारणातील छुपे मुरब्बी मानल्या जाणाऱ्या के. सी. पाडवींनी इतर सर्व उमेदवारांना पटखन देत आपला मतदारसंघावरील प्रभुत्व सिद्ध केले आहे.
डॉ. विजयकुमार गावितांचे दोन्ही बंधू पराभूत झाल्याने एक प्रकारे हा गावित परिवाराच्या राजकारणाला मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे काँग्रेसने जिल्ह्य़ातील आपल्या दोन आमदारांचा आकडा कायम ठेवला असला तरीही पद्माकर वळवी आणि नंदुरबारातील काँग्रेसचा पराभव ही जिल्ह्य़ातील    नेत्यांच्या   अनुषंगाने आत्ममंथनाची गोष्ट असल्याच निकालावरून सिद्ध होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp congress equal success and ncp zero in nandurbar district