सिनेमामध्ये मुख्य भर चांगली गोष्ट चांगल्या पद्धतीने सांगण्यावर असला पाहिजे. त्यासाठी चित्रपट आशय-विषय सशक्त करण्यावर भर दिला पाहिजे. परंतु, आशयगर्भ विषय आणि त्याची परिणामकारक मांडणी यावर लक्ष केंद्रित करून चांगला सिनेमा करण्याऐवजी बॉलिवूडचा सगळा भर सिनेमाचे आक्रमक विपणन करण्यावर असतो. प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यासाठी विपणन करण्याला आक्षेप नाही. परंतु, त्यामुळे बॉलिवूडचे ९० टक्के चित्रपट ‘सिनेमा’ म्हणता येणार नाहीत. आक्रमक विपणनामुळे सिनेमाच्या कलात्मक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो आणि ही बाब निश्चितच खटकणारी आहे, असे मत अभिनेता के. के. मेनन याने व्यक्त केले.
येत्या शुक्रवारी के. के. मेननची प्रमुख भूमिका असलेला ‘अंकुर अरोरा मर्डर केस’ हा हिंदी सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात आपल्या देशातील वैद्यकीय निष्काळजीपणामुळे बळी पडलेल्या रुग्णांच्या वेदना मांडल्या आहेत. ‘नसीम’ या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळविल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या के. के. मेननच्या ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘हजारो ख्वाहिशें ऐसी’, ‘सरकार’, ‘कॉपरेरेट’, ‘गुलाल’ यांसारख्या चित्रपटांमधील भूमिका गाजल्या आहेत.
आपण चित्रपटांत नेहमी गंभीर भूमिकाच साकारतो, असा आरोप सपशेल खोटा असून ‘हनिमून ट्रॅव्हल्स’ किंवा ‘संकेत सिटी’ यांसारख्या हलक्याफुलक्या चित्रपटांतून भूमिका साकारल्या आहेत. परंतु, दुर्दैवाने या चित्रपटांच्या निर्मात्यांकडे चित्रपट सर्वदूरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पैशांची कमतरता भासली. त्यामुळे कदाचित गंभीर भूमिकाच फक्त साकारण्याचा आरोप केला जात असावा, असे के. के. मेननने स्पष्ट केले. एक अभिनेता म्हणून गंभीर, विनोदी किंवा त्यापेक्षाही वैविध्यपूर्ण छटा असलेल्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न आपण करतो. खरे तर प्रत्येक माणूस विनोदी किंवा गंभीर स्वभावाचा असतो. परंतु, आपण या दोन्हींचे मिश्रण असलेल्या भूमिका पडद्यावर साकारल्या आहेत, असेही के. के. मेनने नमूद केले.