बॉलीवूडचा मुख्य प्रवाह अजूनही काहीही करू शकणाऱ्या सर्वशक्तिशाली नायकपटाचाच आहे. ढोबळमानाने सर्व व्यक्तिरेखा, सरधोपटपणा दाखवत शक्तिशाली नायकाच्या विविधरंगी, विविधढंगी ‘स्टाइल’ आणि त्याला रुपेरी पडद्यावर पाहताना प्रेक्षकांवर प्रभाव पाडण्यासाठी चटकदार संवादांची जोड यामुळे हे नायककेंद्री मसालापट चालतात. गल्ला गोळा करणे हा एकमेव उद्देश असल्यामुळे अशा नायककेंद्री चित्रपटांमधील अभिनय, संगीत याबद्दल बोलण्याची काहीच गरज नाही. ‘बॉस’ हा त्यापैकीच आणखी एक चित्रपट आहे. अर्थात ढोबळ आणि तद्दन बिनडोक रंजन करण्यात ‘बॉस’ नक्कीच यशस्वी ठरतो. ‘रावडी राठोड’नंतरच्या या चित्रपटाने ‘ब्रॅण्ड अक्षय कुमार’ अधिक बलवान, शक्तिशाली बनला आहे.
‘तो आला, त्याने पाहिलं आणि जिंकलं’ हे मनाशी ठरवूनच प्रेक्षक चित्रपटगृहात जात असल्यामुळे त्याच्या बाळबोध मनाला पटतील असे सगळे पडद्यावर दाखवत राहणे आणि पठडीबाज फॉम्र्युलाद्वारे भरपूर गल्ला गोळा करणे हेच चित्रपटकर्त्यांचे उद्दिष्ट असते. त्यामुळे ब्रॅण्ड अक्षय कुमार, त्याची हाणामारीची दृश्ये स्वत: करण्याची हातोटी, चटकदार संवाद यामुळे प्रेक्षकाची करमणूक नक्कीच होते. परंतु, यातील मारामारी अति झाली आहे. दर दहा मिनिटांनी एक गाणं, त्याचं तितकंच भडक रंगांचं चित्रीकरण आणि सततची हाणामारी हे ब्रॅण्ड अक्षय कुमारच्या चित्रपटांचे ठळक वैशिष्टय़ आहे.
शिक्षकाचा मुलगा असलेला सूर्या हा लहानपणापासून तापट स्वभावाचा मुलगा काही कारणाने तुरुंगात जातो आणि शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर एका मारामारीच्या घटनेमुळे त्याला तत्त्वनिष्ठ, करारी बाप घर सोडून जायला सांगतो. नंतर त्याला ताऊजी हा ‘ट्रान्स्पोर्ट किंग’ भेटतो आणि मुलासारखे सूर्याला वाढवतो. त्याच्या कारनाम्यांमुळे सूर्या ‘बॉस’ बनतो. त्याच्या टोळीद्वारे तो जगातली सगळी चांगली कामे करतो आणि गोरगरिबांचा कैवारी वगैरे बनतो. दुष्टांचे निर्दालन काय करतो. कॉण्ट्रॅक्ट किलिंगचा व्यवसाय काय करतो. वाट्टेल ते करीत असला तरी बॉस हा नायक आहे. बॉस असल्यामुळे तो सकाळी जॉगिंग ट्रॅकवर धावत नाही, तर ‘जॉगिंग ट्रक’वर धावतो. वर्तुळाकार ट्रक उभे करून त्यांच्या वरून हा बॉस धावतो असे दाखविले आहे. ही त्याची स्टाइल आहे. दुसरी त्याची एक स्टाइल आहे ती म्हणजे बसून चर्चा करायची असली की तो त्याच्या पंटरना शिट्टी वाजवून बोलावतो आणि मग ते सगळे पंटर दहीहंडीचा मानवी मनोरा रचतात त्याप्रमाणे खुर्चीचा मनोरा तयार करतात आणि मग बॉस त्यांच्या अंगावर बसतो. अतिरंजितपणाचा हा कळस प्रेक्षकाचे रंजन करण्यात मात्र यशस्वी न ठरला तरच नवल. सुपरहीरो असलेला अक्षय कुमारने साकारलेला बॉस अचाट, अफाट दाखविण्यासाठी एका दाक्षिणात्य मसालापटाचा भडक रिमेक केला आहे. पटकथेची गुंफण शेवटपर्यंत प्रेक्षकाला उत्कंठा राहील अशी करण्यात लेखकद्वयी चांगलेच यशस्वी ठरतात.
मध्यंतरानंतर बॉस आणि त्याचा प्रमुख विरोधक असलेला चित्रपटाचा खलनायक यांचा सामना कसा रंगणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक बाह्य़ा सरसावून बसतात. अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी खास बनविलेला हा आणखी एक चित्रपट आहे. मारामारी आवडणाऱ्या प्रेक्षकांचीही बिनडोक करमणूक हा चित्रपट करतो.
बॉस
निर्माती -अश्विनी वर्दे
दिग्दर्शक – अॅन्थनी डिसूजा
कथा-पटकथा-संवाद – फरहाद-साजिद
छायालेखन – लक्ष्मण उतेकर
कलावंत – अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्ती, रोनित रॉय, शिव पंडित, अदिती राव हैदरी, जॉनी लिवर, परीक्षित सहानी, गोविंद नामदेव, आकाश दाभाडे, संजय मिश्रा, डॅनी डेंग्झोपा व अन्य.