देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मुलांवर संस्कार हवेत. संस्कारित मुले हीच आपली सर्वात मोठी संपत्ती होय, असे उदगार पुण्याचे महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी काढले.
जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यापीठ अनुदान व जनता शिक्षण संस्थेच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या मुलींच्या नव्या वसतिगृहाचे उदघाटन व बहुद्देशीय क्रीडा संकुलाच्या भूमिपूजन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव भोसले होते.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ. एन. रामास्वामी, सचिव अनिल जोशी, सहसचिव नारायण चौधरी, सामाजिक कार्यकर्ते उदयभाई गुजर, शंकरराव गाढवे, सर्जेराव जाधव, शंकरराव चव्हाण-पाटील, अॅड. नारायण पोफळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशमुख म्हणाले,की शिक्षणामध्ये जीवनाचा कायापालट करण्याचे सामथ्र्य आहे. मुलांमध्ये असलेली गुणवत्ता ओळखून त्यांना विकासाची संधी उपलब्ध करून दिल्यास परिसराचा कायापालट घडविण्याचे सामथ्र्य त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते. आपण घेतलेले शिक्षण पूर्ण होताच आपण आपल्या जन्मगावाकडे कृतज्ञपणे वळणे आवश्यक आहे. त्यामध्ये जीवनमूल्यांबरोबरच शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्यवान माणसे घडावीत.
डॉ. रामास्वामी म्हणाले,‘जनता शिक्षण संस्थेमध्ये शिस्त व पारदर्शकता आहे. मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम अतिशय चांगल्या दर्जाचे झाले आहे. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी गुणवत्तेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. गुणवत्ता असेल तर नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांनी संगणक शिक्षणाकडे अधिक लक्ष देवून स्पर्धा परीक्षांद्वारे प्रशासनामध्ये येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपल्या आवडत्या क्षेत्रातील कौशल्यांचा विकास साधून त्या क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी घ्याव्यात.’
प्रतापराव भोसले म्हणाले,‘सर्व क्षेत्रात नाकर्तेपणाचे वारे वाहत असताना ज्यात कर्तेपणा जिवंत आहे ते विद्यार्थ्यांपुढे ठेवणे आमचे कर्तव्य होते.
विद्यार्थ्यांमध्ये दातृत्वाची परंपरा निर्माण होणे गरजेचे आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे कार्य अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी पुढील वर्षांच्या सुरूवातीस ५ कोटी रु पये खर्चाची व २८ वर्गखोल्यांची नवीन इमारत उभी केली जाईल. त्यामुळे किसन वीर महाविद्यालय सलग पूर्णवेळ ११ ते ५ चालविले जाईल. त्याचे भूमिपूजन पुढील महिन्यात करून नवीन शैक्षणिक वर्षांत इमारत पूर्ण केली जाईल.’
या वेळी आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार मिळवलेले कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी किसन वीर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी ७५ हजार रु पये प्रतापराव भोसले यांच्याकडे दिले होते. ती रक्कम त्यांनी सचिव अनिल जोशी यांच्याकडे सुपूर्द केली.
उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी किसन वीर महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापक यांनी जमा केलेले २ लाख ६५ हजार १२५ रु पये, जनता शिक्षण संस्थेचे १ लाख रु पये व चेअरमन प्रतापराव भोसले यांचे ५० हजार रु पये असे एकूण ४ लाख १५ हजार १२५ रु पयांचा धनादेश आयुक्त देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
उपसचिव नारायण चौधरी, एस. डी. पाटील यांनी स्वागत केले. तर, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर येवले यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्या प्रा. उज्ज्वला शितोळे यांनी आभार मानले.