*  एलबीटीमुळे उत्पन्नात घट
* विकासाच्या योजनांवर भर
महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी १०६१ कोटींचा प्रस्तावित आणि १०४७ कोटी रुपयाचा सुधारित अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. स्थानिक स्वराज्य संस्था करामुळे महापालिकेची आवक कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम अर्थसंकल्पावर झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रस्तावित अर्थसंकल्प १५० कोटींनी कमी केला आहे. यावेळी कशावरही कर वाढविण्यात आलेला नाही.
 शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी अत्याधुनिक साधनासह मिलिंग मशीनचा उपयोग करणार आहे. महापालिकेच्या उत्पन्न वाढीची प्रक्रिया वित्तीय वर्षांत सुरू ठेवून उत्पन्नाची बाजू मजबूत करीत असताना रस्ते, पाणी पुरवठा, प्रकाश व्यवस्था, प्रदूषण मुक्त, आरोग्य, स्वच्छता या शहराच्या विकास योजनाच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. १ एप्रिल २०१३ मध्ये ७.८३ लक्ष शिल्लक आहे. २०१४ -१५ सुधारित अंदाजपत्रकात जकात करापासून ३६० कोटी, मालमत्ता करापासून १८३ कोटी, पाणी १२० कोटी, बाजार वसुली ४.९६ कोटी, सरकारी अनुदान १८३ आणि इतर उर्वरित बाबींपासून २०९.९२ कोटी रुपये अपेक्षित आहेत.
३० नोव्हेंबपर्यंत आठ महिन्याच्या कालावधीत एकूण प्राप्त सकल उत्पन्न ४४०.५२ कोटी असून स्थानिक संस्था करापासूच्या उत्पन्नात यापूर्वीच्या वर्षांतील जकातीद्वारा प्राप्त उत्पन्नाशी तुलना केली तर अंदाजे ११४.४२ एवढी घट झाली आहे. २०१३ -१४ च्या प्रस्तावित अर्थसंकल्पात एकूण अपेक्षित खर्च २४.५७ कोटी असून यात कर्मचाऱ्यांच्या वेतनावर २५४.०६, सेवानिवृत्तीवेतन ९.४२, संभाव्य खर्च २११.७० कोटी, विविध कामांच्या सुस्थिती व दरुस्ती खर्चासाठी १६.८० कोटी, भांडवली खर्च ५.८२३, कर्ज परतफेड ५.३१, इतर खर्च ५६.५८. महापालिकेचा स्थानिक संस्था कर हा महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत आहे. एप्रिल व मे महिन्यात महापालिकेला आठ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. जवळपास अंदाजे १४१.२२ कोटी इतक्या मोठय़ा प्रमाणात तूट झाली आहे. २०१४ -१५ या वर्षांत एलबीटी कराचे उत्पन्न ४४० कोटीपर्यंत जाईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
मालमत्ता करापासून १८३.०९ कोटी रुपये प्राप्त होतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिका क्षेत्रात फेरीवाल धोरण लागू करण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी शहरातील सर्व हॉकर्स, व्यावसायिकांची नोंदणी करण्याचे काम केले आहे. सक्करदरा मार्केट, बुधवार बाजार, मंगळवारी, सदर बाजार, मच्छी मार्केट बाजूला रिकाम्या जागेवर भाजी व शॉपिंग कॉम्प्लेक्स नवीन योजना प्रस्तावित आहेत. बाजार विभागाकडून ४.३० कोटी उत्पन्न अपेक्षित आहे. शहरातील दाटीवाटीच्या क्षेत्रातील चटई निर्देशांक वाढल्यामुळे बांधकाम संदर्भात नवीन धोरण तयार करून ते मंजुरीसाठी सभागृहासमोर ठेवण्यात येणार आहे. शहरातील रस्त्यांच्या कामाचा दर्जा अधिक चांगला व्हावा या उद्देशाने मिलिंग मशीन खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील वर्षांच्या अर्थसंकल्पात २.५० कोटीची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय हॉटमिक्स प्लॅंटसाठी दोन टिप्पर खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी ५० कोटींची तरतूद केली आहे.
टँकरने शहरातील विविध भागात पाणी पुरवठा केला जात असताना टँकर रिकामे होईपर्यंत ते थांबविले जात असल्यामुळे त्यात बराच वेळ जात होता. त्यामुळे ज्या वसाहतीमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा शक्य नाही अशा ठिकाणी मोकळ्या मैदानात प्लॅटफॉर्म उभारून पाच हजार लिटरची टाकी त्याठिकाणी लावण्यात येणार आहे. त्या टाकीमध्ये टँकरद्वारे पाणी भरण्यात येईल आणि नागरिकांना ते सोयीचे होईल. टँकरजवळ होणारी गर्दी कमी होईल.
महापालिकेच्या ई प्रशासनासोबत नागरिकांना मोबाईलद्वारे थेट संपर्क साधता येईल. स्मार्ट फोनमध्ये एनएमसीद्वारा अप्लीकेशन तयार करण्यात येईल. अप्लीकेशन स्मार्ट फोनधारक आपल्या मोबाईलमध्ये डाऊन लोड करू शकेल. यामार्फत महापालिकेच्या सुविधाचा (ई प्रशासनाचा) लाभ घेता येईल. मनीषनगरातील उड्डाण पुलासाठी २ कोटी, पारडी रेल्वे उड्डाण पुलासाठी २ कोटी तरतूद करण्यात आली आहे.  मस्कासाथ रेल्वे उड्डाण पूल आणि इतवारी रेल्वे स्टेशन उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यात आले असून मस्कासाथसाठी ४६ लक्ष रेल्वेकडे जमा केले आहेत. अजनी रेल्वे स्टेशनजवळील पुलासाठी ३०० कोटी, मेट्रो रेल्वेसाठी ४५० कोटी, मॉडेल सोलर सिटी ९.३० कोटी तरतुद केली. कवी सुरेश भट साहित्य व सभागृहासाठी १४ कोटी खर्च झाले आहे. २०१५ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे. वाहतुकीस अडथळा असणारे खांब हटविण्यासाठी ५० कोटीची कामे हाती घेण्यात आली आहे. प्रस्तावित अर्थसंकल्पात त्यासाठी २५ कोटीची तरतूद केली आहे.

असा येणार पैसा
(टक्क्य़ांमध्ये)
जकात कर – ४१.५४
मालमत्ता कर – १८.०३
पाणी कर – ११.७८
सरकारी अनुदान – ९.२५
बाजार विभाग – ०.४१ कोटी
इतर               १२.८९
ठेवी गुंतवणूक      ५.६२
अग्रिम वसुली       ०.५७

असा जाणार पैसा
अस्थापना खर्च – २४.५७
सेवानिवृत्त वेतन – ९.४२
प्रशासकीय खर्च   २.५५
प्रवर्तन- दुरुस्ती    १६.८०
कर्ज परतफेड       ५.३१
निक्षेप ठेवी           ५.१७