यवतमाळमध्ये ऐन रणरणत्या उन्हात पोटनिवडणूक होत असून येरावार- पारवेकर यांच्यात लढत होत असली तरी प्रत्यक्षात काँग्रेस व भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची शक्तिपरीक्षासमजली जात आहे. शिवसेना व भाजपच्या भविष्यातील राजकारणावरही पोटनिवडणुकीच्या निकालाचा परिणाम प्रभाव टाकू शकतो.
आमदार नीलेश पारवेकर यांच्या अपघाती निधनामुळे यवतमाळ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसने नंदिनी पारवेकर यांना तर भारतीय जनता पक्षाने मदन येरावार यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. काँग्रेस व भाजप उमेदवारांमध्ये लढत असली तरी ती प्रत्यक्षात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे व भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांच्यात लढली जाणार असून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते कामाला भिडले आहेत.
ही पोटनिवडणूक जिंकणे काँग्रेसच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे आहे. कारण, काँग्रेसचे नीलेश पारवेकर वीस हजाराहून अधिक मते घेऊन निवडून आले होते. त्यांच्या अपघाती निधनाने वर्षभरासाठी या मतदारसंघाचा प्रतिनिधी निवडून देतानाच यवतमाळातील वर्चस्व आणि मताधिक्य काँग्रेसला टिकवून ठेवावे लागणार आहे. याची जबाबदारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. माणिकराव ठाकरे यांचा यवतमाळ हा गृहजिल्हा आहे. त्यांनी मुलगा राहुल याच्यासाठी उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न चालविले होते. त्याला श्रेष्ठींनी खतपाणी न देता पारवेकर घराण्याच्या स्नुषा नंदिनी यांच्याच पदरात माप टाकले आहे. त्यामुळे माणिकरावांवर त्यांच्या विजयाची जबाबदारी येऊन पडली आहे. राजकारणात कदाचित त्यांना विजयाचे श्रेय मिळाले नाही तरी खडकवासला पोटनिवडणुकीसारखे झाले तर त्यांच्या राजकीय वाटचालीवर याचा विपरीत परिणामही होऊ शकतो.
मुख्यमंत्री गटाला ठाकरे गटाविषयी आपलेपण ठेवत नसल्याने त्या गटाला आयतीय संधी मिळेल, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. मतदारसंघांची पुनर्रचना होईपर्यंत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजप हे पारंपरिक शत्रू राहिले आहेत. नवा यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला तेव्हा शिवसेनेने या जागेवर दावा ठोकला. सध्या शिवसेनेच्या भावना गवळी खासदार आहेत. विधानसभेची पोटनिवडणूक भाजपने खेचून आणली तर शिवसेनेची ही डोकेदुखी ठरू शकते आणि आगामी २०१४ साली होणाऱ्या लोकसभेसाठी भाजप दावा करू शकतो.
ही पोटनिवडणूक भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरली आहे. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर ही राज्यात होत असलेली ही पहिलीच पोटनिवडणूक आहे. काँग्रेसविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे त्यांचे लक्ष्य असून त्या दृष्टीनेही ही पोटनिवडणूक त्यांच्या राजकीय कौशल्याची परीक्षा घेणारी ठरणार आहे.
नीलेश पारवेकर यांच्या अपघाती निधनानंतर आलेल्या सहानूभुतीच्या लाटेचा फायदा घेऊन ही जागा स्वत:कडे कायम ठेवण्याचा काँग्रेस आटोकाट प्रयत्न करीत आहे. तर खडकपासलाच्या पाश्र्वभूमीवर ही जागा खेचून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. ही जागा खेचून आणली तर देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव व राजकीय वजनही वाढणार आहे. त्यामुळेच यवतमाळ पोटनिवडणुकीच्या निमित्ताने माणिकराव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्षांला सुरुवात झाली आहे.