नवी दिल्लीत धावत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर उपचार घेताना मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी पीडित मुलीला सोलापुरात विविध क्षेत्रातील नागरिकांनी चार हुतात्मा पुतळ्यांजवळ मेणबत्या प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण केली.    
माहिती अधिकार कायदा चळवळीचे कार्यकर्ते तथा आम आदमी पार्टीचे संस्थापक-सदस्य विद्याधर दोशी यांच्या पुढाकाराने सायंकाळी चार हुतात्मा पुतळ्यांजवळ नागरिक व स्त्री-पुरुष कार्यकर्ते एकत्र आले. या सर्वानी मेणबत्त्या प्रज्वलित करून पीडित तरुणीच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करीत तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, विद्याधर दोशी, प्राणिमित्र विलास शहा, चंदूभाई देढिया, प्रा.राजन दीक्षित, रुद्रप्पा बिराजदार, सचिन मस्के, मिलिंद राऊत, तसेच अनिता मडगे, जयश्री जाधव, सारिका गायकवाड, माधुरी खांडेकर, अश्विनी बोडसे आदींनी श्रद्धांजली सभेत सहभाग नोंदविला होता.