जलस्वराज्य, भारत निर्माण या सारख्या पाणीपुरवठा योजनांवर कोटय़वधीचा खर्च होऊनही योजना पूर्ण होत नसतील, तर त्या-त्या गावातील पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष, सचिव यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करा, अशा सूचना आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या आहेत.
तालुक्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर सेनगाव पंचायत समितीच्या सभागृहात आमदार गोरेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. जि.प. उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. धांडे, तहसीलदार सारंग चव्हाण, गटविकास अधिकारी साहेबराव कांबळे आदी या वेळी उपस्थित होते. सुरुवातीला कांबळे यांनी नियोजित बैठकीची व पाणीपुरवठय़ावर आतापर्यंत झालेल्या कामाची माहिती दिली.
बैठकीत अनेक गावांतील सरपंच, पदाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईचे अनेक मुद्दे उपस्थित करून भारत निर्माण, जलस्वराज्य पाणीपुरवठा योजनेची अपूर्ण व निकृष्ट कामांवर नाराजी व्यक्त केली. गावांमध्ये जलस्वराज्य पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्याने योजनेचा लाभ होत नाही. तसेच ही योजना गावाच्या नावावर असल्याने इतर सुविधा, उपाययोजनांपासून गावाला मुकावे लागते. अपूर्ण योजनेची कामे पूर्ण करणे, गावात नवीन विंधन विहिरी घेणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबतच्या सूचना उपस्थित सरपंचांनी केल्या.
सरपंचांनी केलेल्या सूचनांचा धागा धरून आमदार पाटील यांनी पाणीपुरवठा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. सन २००८ पासून शेतकऱ्यांच्या विहीर, बोअर अधिग्रहणाचे पैसे त्यांना अजून मिळाले नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
३८ गावांमधील पाणीयोजनांची कामे वारंवार सूचना देऊन पूर्ण होत नाहीत. जलस्वराज्य पाणीपुरवठा, भारत निर्माणसारख्या योजनेवर कोटय़वधींचा निधी खर्च करून त्या योजना अपूर्ण असल्याने ग्रामस्थ पिण्याच्या पाणीटंचाईला तोंड देतात, ही बाब खेदजनक असून जलस्वराज्य, भारत निर्माणची कामे पूर्ण न करणाऱ्या पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्ष, सचिवांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना त्यांनी केल्या.
ज्या गावातील पाणीपुरवठा योजनेची कामे अपूर्ण आहेत, त्या गावातील पाणीपुरवठा समिती अध्यक्ष, सचिव व सरपंचाच्या पाणीप्रश्नावर तातडीची स्वतंत्र बैठक घेऊन यावर निर्णय घ्यावा, तसेच पाणीटंचाईवर अचूक व परिपूर्ण आराखडय़ाचे नियोजन करून प्रस्ताव लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.