विदर्भातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती बुधवारी येत आहे.  ११ व १२ सप्टेंबरदरम्यान ही समिती विदर्भातील विविध ठिकाणी भेट देणार असून जिल्हानिहाय आढावा घेणार आहे. या समितीच्या दौऱ्यानंतरच केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार विदर्भाचा दौरा करणार असल्याने महसूल यंत्रणा कामाला लागली आहे.
विदर्भातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारने फक्त पॅकेज जाहीर केले आहे. तात्कालिक मदत वगळता अद्याप मदतीचे वाटप झालेले नाही. केंद्र सरकारकडून मदतीची प्रतीक्षा केली जात आहे. विदर्भातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारची समिती दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहे. केंद्राची एकूण चार पथके विदर्भाचा दौरा करणार आहेत. यातील दोन पथके अमरावती विभागाला तर दोन पथके नागपूर विभागाला भेट देणार आहे. नागपूर विभागात येणाऱ्या पथकात सात अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात गोपाल रेड्डी (गृह खाते), कोल्हटकर (पुणे), सी. ओमप्रकाश (फलोत्पादन), राम वर्मा (ग्रामविकास खाते), जी.एस. राव (निर्यात विभाग), मीना (रस्ते व परिवहन) आणि चंद्रशेखर (नियोजन विभाग) यांचा समावेश आहे.
कृषीमंत्री पवार १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान विदर्भातील पूरग्रस्त भागांना भेट देणार आहेत. ते जिल्हानिहाय आढावाही घेणार आहेत. कृषीमंत्री व केंद्रीय समितीचा दौरा जाहीर झाल्याने महसूल यंत्रणा कामाला लागली आहे. पीक हानी, जीवित हानी, सरकारी मदतीचे वाटप, रस्ते व घरांच्या नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे. केंद्रीय समितीच्या दौऱ्यासोबतच इतर कामांमध्ये प्रशासन व्यस्त झाले आहे.