कर्नाळा महोत्सव, रोटरी फेस्टिवल त्यानंतर मल्हार महोत्सवाची धूम झाल्यानंतर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात कांतिलाल प्रतिष्ठानने पनवेलमध्ये ‘चैतन्य लोकोत्सव’आयोजित केला आहे. येथील मिडलक्लास सोसायटीच्या मैदानात ८ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत हा लोकोत्सव होणार आहे.  राज्यभरातील सांस्कृतिक चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या विविध मान्यवरांचे कार्यक्रम या सोहळ्यात होणार आहेत. प्रत्येक दिवशी सांस्कृतिक सोहळ्याची पर्वणी या निमित्ताने पनवेलकरांना अनुभवता येणार आहे.
प्रतिष्ठानने या सांस्कृतिक नगरीला स्व. हरीशचंद्र चांगू कडू असे नाव दिले आहे. ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगशेकर यांच्या प्रेरणेतून व सहकार्याने हा सोहळा आयोजित केला असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष कांतिलाल कडू यांनी सांगितले. सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. व्यासपीठाचे अध्यक्ष संगीतकार ह्रदयनाथ मंगशेकर हे असणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची उपस्थिती असेल. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘शिवकल्याण राजा हा संगीतमय कार्यक्रम संगीतकार ह्रदयनाथ मंगशेकर सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन बाबासाहेब पुरंदरे करणार आहेत. दुसऱ्या दिवशी रश्मी वाद्यवृंदाचा बहारदार आविष्कार अनुभवता येईल. तिसऱ्या दिवशी नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रम संगीतकार हृदयनाथ मंगशेकर, डॉ. सलिल कुलकर्णी, विभावरी आपटे व राधा मंगेशकर सादर करणार आहेत.
चौथ्या दिवशी हर दिल जो प्यार करेगा हा वाद्यवृंदाचा कार्यक्रम होणार आहे. पाचव्या दिवशी अमृताचा घनू हा प्रासादिक गीतांच्या कार्यक्रमात  विद्यावाचास्पती शंकर अभ्यंकर यांचे निवेदन व प्रवचन ऐकण्याची संधी लाभणार आहे. सहाव्या दिवशी लावणी महानायिका या लावणी कार्यक्रमात माया खुटेगावकर, तृप्ती पुणेकर, वैभवी मुंबईकर, संगीता लाखे व इतरांचा नृत्याविष्कार येथे पाहायला मिळेल. सातव्या दिवशी येथे उदय साटम यांच्या संकल्पनेतून ३५ कलाकारांचा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा कार्यक्रम तर शेवटच्या दिवशी संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकर व पद्मजा फेणाणी- जोगळेकर यांचा मंगलदीप हा कार्यक्रम होईल.  राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यावेळी उपस्थित राहणार असल्याचे प्रतिष्ठानातर्फे सांगण्यात आले. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या सोहळ्यादरम्यान प्रतिष्ठानतर्फे गौरविण्यात येणार आहे. रोज सायंकाळी हे कार्यक्रम सात वाजता सुरू होतील. १० रुपये प्रवेशशुल्क देऊन या कार्यक्रमाचा आनंद पनवेलकरांना घेता येईल असे आयोजकांनी जाहीर केले आहे.