माळशिरसचे माजी आमदार चांगोजीराव आबासाहेब देशमुख (८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अकलूज येथे वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक पुत्र, सात कन्या, सून, नातवंडे असा परिवार आहे. माळशिरस तालुका पंचायत समितीचे सदस्य पांडुरंग देशमुख यांचे वडील होत.
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे चांगोजीराव देशमुख यांनी माळशिरस तालुक्याच्या विकासात मोहिते-पाटील कुटुंबीयांना मोलाची साथ दिली होती. १९७२ साली सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे चिरंजीव विजयसिंह मोहिते-पाटील यांचा विवाह सोहळा ‘लक्ष भोजना’मुळे देशभर गाजला होता. त्याचे पडसाद नवी दिल्लीत उमटले होते. परिणामी, त्या वेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने शंकरराव मोहिते-पाटील यांचे तिकीट कापले होते. परंतु त्या वेळी मोहिते-पाटील यांनीही आपले घनिष्ट सहकारी म्हणून चांगोजीराव देशमुख यांना विधानसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून दिले होते. अकलूजचे दहा वर्षे सरपंचपद सांभाळणारे देशमुख यांनी नंतर माळशिरस तालुका पंचायत समितीचे सभापतिपद, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २० वर्षे संचालक व उपाध्यक्षपद, जिल्हा भूविकास बँकेचे अध्यक्षपद, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालकपद, अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सुरुवातीपासून उपाध्यक्षपद अशी विविध पदे भूषवली होती. त्यांच्या अंत्यविधीप्रसंगी विविध राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक, बँकिंग, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. यात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार सुधाकर परिचारक, शेकापचे माजी आमदार भाई एस. एम. पाटील, निर्मला ठोकळ, शंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, पांडुरंग साखर कारखान्याचे अध्यक्ष दिनकर मोरे आदींचा समावेश होता.
संग्रहित लेख, दिनांक 18th Feb 2014 रोजी प्रकाशित
चांगोजीराव देशमुख यांचे वृद्धापकाळाने निधन
माळशिरसचे माजी आमदार चांगोजीराव आबासाहेब देशमुख (८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अकलूज येथे वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
First published on: 18-02-2014 at 03:10 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changojirao deshmukh passed away