लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांना आव्हान ठरेल, अशा उमेदवाराची राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू झाली आहे. सुरुवातीला आमदार अमरसिंह पंडित यांचे नाव चर्चेत आणल्यानंतर त्यांना पक्षातूनच एकमुखी पाठिंबा मिळत नसल्याने आता पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे नाव पुढे आले आहे. स. मा. गर्गे पुरस्कार वितरण सोहळ्यात क्षीरसागर, मुंडे समर्थकांच्या घोषणा युद्धाने आगामी काळातील चुणूक दिसली. खासदार मुंडे थेट अजित पवारांनीच मैदानात उतरावे, त्यांना हिसका दाखवू, असे आव्हान देत राजकीय बांधणीला सुरुवात केली आहे.
भाजपचे लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांचा बीड हा बालेकिल्ला. राज्याच्या राजकारणात मुंडे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष पेटल्यानंतर मागील सहा वर्षांत अजित पवारांनी फोडाफोडी करत मुंडेंच्या बालेकिल्ल्याला चांगलेच सुरूंग लावले. दोन आमदारांसह ज्येष्ठ बंधू पंडितराव मुंडे व पुतणे धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत घेतले. या पाश्र्वभूमीवर पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभेची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.
मागच्या खेपेला मुंडेंच्या विरोधात रमेश आडसकर यांना मैदानात उतरवून पवारांनी प्रतिष्ठा लावत अर्धे मंत्रिमंडळ मैदानात उतरवले. चार वर्षांत राजकीय पुलाखालून आता बरेच पाणी वाहून गेले आहे. मुंडेंचे घर फुटले, अनेक जण सोडून गेले. या पाश्र्वभूमीवर जि.प.च्या निवडणुकीत मुंडेंनी पुन्हा जनमत आपल्या बाजूने असल्याचे सिद्ध केल्यामुळे राष्ट्रवादीचे नेतृत्व बुचकळ्यात पडले. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत मुंडेंना आव्हान ठरेल, असा उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे.
गेवराईचे भाजपचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन लागलीच विधान परिषदेवर घेतले. तेव्हापासून खासदार मुंडेंच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी अमरसिंह पंडितांना आमदारकी बक्षीस दिल्याचे चर्चेत होते. मात्र, अमरसिंह पंडित यांच्या नावाला पक्षातीलच प्रमुख नेते व आमदारांचे एकमुखी समर्थन मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अजित पवारांनी आता नव्या उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. दुसऱ्या बाजूला मंत्री नको म्हणून जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी लोकसभेची उमेदवारी क्षीरसागरांकडे जावी, या साठी वातावरण निर्मिती करीत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या बैठकीतच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ, लक्ष्मण ढोबळे, जयदत्त क्षीरसागर यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागणार असल्याचे संकेत दिल्याचे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध झाले. बीडमधून राष्ट्रवादीकडून जयदत्त क्षीरसागर हे लोकसभेचे उमेदवार असतील अशी चर्चा राष्ट्रवादीच्या गटातून सुरू झाली आहे.
क्षीरसागर यांच्याकडेच जिल्ह्य़ाच्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याची तगडी यंत्रणा आहे. तेच खासदार मुंडे आव्हान ठरू शकतील. ओबीसी मतात फूट झाल्यानंतर मराठा समाजाची मते राष्ट्रवादीला मिळतील आणि उमेदवार विजयी होईल, असे दावा जिल्ह्य़ातील अजित पवार समर्थक दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी सुरू केले आहेत.
यात क्षीरसागरांना उमेदवारी देऊन त्यांचा मंत्रिमंडळातील व जिल्ह्य़ातील राजकारणावरील प्रभाव कमी करणे, असा डाव असल्याचेही लपून राहत नाही. त्यामुळे खासदार मुंडे यांनीही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचे डाव लक्षात घेऊन धारूर तालुक्यातील देवदहिफळ येथील दुष्काळी परिषदेत थेट आपल्या विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच मैदानात उतरावे, त्यांना हिसका दाखवू, जिल्ह्य़ातील चेल्यांना मैदानात उतरवून कशाला बळीचा बकरा बनवता? असे आव्हान दिले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jan 2013 रोजी प्रकाशित
पवारांची चाचपणी, मुंडेंची बांधणी सुरू!
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांना आव्हान ठरेल, अशा उमेदवाराची राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू झाली आहे.
First published on: 18-01-2013 at 01:16 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Checking by pawar munde starts construction