बुद्धिबळाची पंढरी म्हणून ओळखल्या जात असलेल्या सांगली शहरामध्ये १ ते ३० मे या कालावधीमध्ये बुद्धिबळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त १० विविध बुद्धिबळ स्पर्धा तसेच बुद्धिबळ प्रशिक्षण वर्गाचे आयोजनही करण्यात आले आहे. सांगली शहराला बुद्धिबळाची वेगळी परंपरा आहे. अखंड ४६ वर्षे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा एक महिनाभर भरविणारे बुद्धिबळ भीष्माचार्य कै. भाऊसाहेब पडसलगीकर यांचे बुद्धिबळातील कार्य अद्वितीय आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या नूतन बुद्धिबळ मंडळाच्या वतीने बुद्धिबळ महोत्सवाचे आयोजन बापट बालशिक्षण मंदिर येथे करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये विविध वयोगटांतील १० स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
२ लाख ५५ हजार रुपये बक्षीस रकमेची बाबूकाका शिरगांवकर स्मृती आंतरराष्ट्रीय मानांकन खुली बुद्धिबळ स्पर्धा, प्रवेशशुल्क नसलेली व महिलांच्या निवासाची मोफत सोय असलेली १ लाख रुपये पारितोषिकाची मीनाताई शिरगांवकर स्मृती आंतरराष्ट्रीय मानांकन खुली महिला बुद्धिबळ स्पर्धा, ५० वर्षांवरील पुरुषांसाठी पंडित रघुनंदन शर्मा-ओझा स्मृती खुली बुद्धिबळ स्पर्धा, श्रीमंत बाळासाहेब लागू स्मृती जलद स्पर्धा, एन. आर. जोशी स्मृती खुली अतिजलद बुद्धिबळ स्पर्धा या स्पर्धाही या कालावधीत होणार आहेत.
याचबरोबर २७ ते ३० मे या काळात आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षकांकरिता प्रशिक्षण वर्ग तसेच १२०० ते १८०० मानांकन प्राप्त करणाऱ्या खेळाडूंसाठी प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Apr 2013 रोजी प्रकाशित
सांगलीत १ मे पासून बुद्धिबळ महोत्सव
बुद्धिबळाची पंढरी म्हणून ओळखल्या जात असलेल्या सांगली शहरामध्ये १ ते ३० मे या कालावधीमध्ये बुद्धिबळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त १० विविध बुद्धिबळ स्पर्धा तसेच बुद्धिबळ प्रशिक्षण वर्गाचे आयोजनही करण्यात आले आहे.
First published on: 30-04-2013 at 01:30 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chess festival from 1 may in sangali