महाल परिसरात गांधीगेटजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञान व्यक्तींनी विटंबना केल्यामुळे गुरुवारी दिवसभर महाल परिसरात तणाव होता. आरोपींना त्वरित अटक करा, अशी मागणी करीत भाजप, शिवसेना, मनसेच्या कार्यकर्त्यांसह विविध शिवप्रेमी संघटनांनी पुतळ्यासमोर धरणे देऊन ‘रास्ता रोको’ आणि जाळपोळ केली. यावेळी आठ स्टार बसेसची तोडफोड करण्यात आली.
बुधवारी पहाटे काही अज्ञान व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तलवार वाकवून ठेवली. पुतळ्याला भाजपचा दुपट्टा आणि भगवे कापड बांधले. सकाळी ६ वाजताच्या सुमारास परिसरात राहणारे राजू बोरडे, शेखर कुकडे आणि जितेंद्र शिर्के यांना हा प्रकार दिसला. शिर्के यांनी नगरसेवक प्रवीण दटके आणि बंडू राऊत यांना माहिती दिल्यावर ते घटनास्थळी आले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची वार्ता महाल परिसरात कळताच बजरंग दल, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवराज प्रतिष्ठान आदी संघटनेचे हजारो कार्यकर्ते आणि नेते घटनास्थळी आले. गणेशपेठ आणि कोतवाली पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावर पोलिसांचा ताफा घटनास्थळी आला.
दरम्यान, पुतळ्याची विटंबना केल्यामुळे सर्व शिवभक्तांनी रस्त्यावर टायर जाळून पोलिसांच्या विरोधात घोषणा देणे सुरू केले. ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा देत परिसरात फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. काही वेळाने लोक घटनास्थळी येऊ लागल्याने परिसरात गर्दी वाढली. पुतळ्याकडे येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले. त्या भागातून जाणाऱ्या स्टार बसेसची कार्यकर्त्यांंनी तोडफोड सुरू केल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. गणेशपेठ, तहसील आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेले महापौर अनिल सोले, पोलीस आयुक्त के. के. पाठक, पोलीस उपायुक्त संजय दराडे यांनी कार्यकत्यार्ंना शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलीस आयुक्तांनी काही प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. आयुक्त तेथून जात नाहीत तोच आंदोलकांनी पुन्हा जाळपोळ सुरू केली. परिसरात पोलीस चौकी उभारण्यात यावी, पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, गणेशपेठ आणि कोतवाली पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना निलंबित करण्यात यावे आणि पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना चोवीस तासात अटक करण्यात यावी, अशा मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या.
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे परिसरात पोलीस चौकी उभारण्यात आली. शिवाय सीसीटीव्ही लावण्यात आले. मात्र, जोपयर्ंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दिवसभर विविध संघटनांनी पुतळ्यासमोर धरणे दिले. महाल, बडकस चौक आणि झेंडा चौक परिसरातील संपूर्ण बाजारपेठ दिवसभर बंद होती. खासदार विलास मुत्तेमवार, भाजपचे आमदार विकास कुंभारे, प्रदेश महासचिव संजय भेंडे, महापालिकेचे सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, नासुप्रचे विश्वस्त छोटू भोयर, प्रमोद पेंडके,  शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे, नगरसेवक किशोर कुमेरिया, राजू हिरडे, मनसेचे प्रवीण बरडे, राजे मुधोजी भोसले, बजरंग दलाचे सुबोध आचार्य, अमोल ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे श्रीकांत आगलावे, भाजयुमोचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे, दत्ता शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय पाटील, आदी विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, तलवार सरळ करण्यात येऊन पुतळ्याला बांधण्यात आलेले भगवे कापड काढण्यात आल्यानंतर महापौरांनी पुतळ्याला पुष्पहार घातला.