गेल्या वर्षीच्या प्रचंड यशानंतर बालचमूंचा लाडका छोटा दोस्त ‘चिंटू’ आपल्या सवंगडय़ांसह पुन्हा एकदा ‘चिंटू २ खजिन्याची चित्तरकथा’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर येत असल्याची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी दिली. शुक्रवारी (दि. १९) प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची माहिती गोडबोले यांनी पत्रकार बैठकीत दिली.
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पहिल्या भागात चिंटू आणि त्याच्या गँगने अतिक्रमण झालेले क्रिकेटचे मैदान पुन्हा खेळण्यासाठी ताब्यात मिळवून सर्वाचीच वाहवा मिळविली होती. या वर्षी उन्हाळ्याच्या सुटीमध्ये चिंटू, पप्पू, मिनी, बगळ्या, राजू आणि नेहा यांच्यासमवेत एका साहसी खेळाच्या शिबिराला जातो आणि उलगडत जाते एक गोष्ट आणि अद्भुत साहसाची चित्तरकथा.
या शिबिरादरम्यान चिंटूला तलावाच्या तळाशी एक पदक सापडते. या पदकाचा संबंध त्या गावातल्या एका प्राचीन गुप्त खजिन्याशी असल्याचे चिंटूला योगायोगाने समजते आणि त्याच्या मनातले कुतूहल जागे होते. खरे साहस करायचे असेल तर आपण सर्वानी मिळून या खजिन्याचा शोध घ्यायचा, असे चिंटू ठरवतो आणि सगळ्या मुलांना पटवतो. त्यानंतर सुरू होतो गुप्त खजिन्याचा शोध! पूर्वी लहान-सहान गोष्टींना घाबरणारी ही मुले अनेक संकटांना तोंड देत, अनेक अडथळे पार करत वर्षांनुवर्षे कुणीही शोध न शकलेला गुप्त खजिना कसा शोधतात, याची रोमांचकारी गोष्ट म्हणजे ‘चिंटू २ खजिन्याची चित्तरकथा.’
या चित्रपटासाठी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी उत्कृष्ट सेट्स उभे केले आहेत. अनुज देशपांडे यांचे स्पेशल इफेक्ट, अमलेन्दू चौधरी यांचे छायालेखन, गीतकार संदीप खरे आणि संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी या जोडगोळीचे अप्रतिम गीत-संगीत व श्रीरंग गोडबोले यांचे दिग्दर्शन या चित्रपटाच्या काही जमेच्या बाजू असल्याचे सांगण्यात आले. पत्रकार बैठकीत चिंटूची भूमिका साकारणारा शुभंकर अत्रे, विभावरी देशपांडे व चारुहास पंडित उपस्थित होते.