तळमजल्यावरून माडी आणि माडीवर चढविलेल्या इतर चार माडय़ा, त्या माडय़ांमधील खोल्यांचे येणारे रोख भाडे आणि या रोख पैशांच्या जिवावर चाळमालकांचे चाललेले अर्थकारण, अशी बेकायदा बांधकामांची चाळसंस्कृती सिडको वसाहतींच्या कुशीमध्ये सध्या पोसली जात आहे. पनवेल तालुक्यामधील नवीन पनवेल, खांदेश्वर, कळंबोली, आणि खारघरसारख्या नियोजित वसाहतींमध्ये अत्यल्प व मध्यम गटासाठी बांधलेल्या चाळपद्धतीला बकाल स्वरूप आले आहे.
पनवेल तालुक्यामध्ये सिडकोने पंचवीस वर्षांपूर्वी नियोजित वसाहती बांधल्या, परंतु या वसाहतींमधील बांधकामांवर नियंत्रण न ठेवल्यामुळे ही बेकायदा बांधकामे फोफावली. समुद्रसपाटीपासून सात फूट खोल असलेल्या कळंबोली वसाहतीमध्ये याच बेकायदा बांधकामांनी शेकडो नागरिकांना आधार दिला, परंतु त्यानंतर झपाटय़ाने चाळींच्या जागेवर इमले बांधण्याची स्पर्धा सध्या लागली आहे. तळमजल्याच्या परवानगी असणाऱ्या कळंबोली वसाहतींमधील तीन हजार बैठय़ा घरांची १२ हजार घरे तयार झाली आहेत. अशीच काहीशी परिस्थिती नवीन पनवेल सेक्टर ७ व ए टाइप येथील घरांची आहे.
खारघरमधील बैठय़ा वसाहतींमध्येही मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे करण्यात आली आहेत. आजही या चाळींमधील रहिवाशांना दरुगधीयुक्त पाणी प्यावे लागते. चाळ बांधताना सिडकोने अग्निशमन बंबाची जलवाहिनी भूमिगत केली, मात्र पंचवीस वर्षांनी ती वाहिनी माडीच्या तर विजेच्या वाहिनी घरांखाली पुरल्या गेल्या आहेत. एखादी विजेची डीपी जळाल्यावर घराखालून धूर येण्याचे प्रकार येथे प्रत्येक पावसाळ्यात घडतात. तरीही खोल्यांचे मिळणारे भाडे यामुळे या सर्व धोकादायक घटना दुर्लक्षित होतात. या चाळींमधील रहिवाशांची लोकसंख्या चारपटीने वाढल्याने या बडय़ा मतदारराजाला दुखावण्याची धमक सध्याच्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींमध्ये नाही. त्यामुळे बेकायदा बांधकामाला अप्रत्यक्षपणे पािठबाच मिळत आहे. पनवेल नगर परिषदेच्या परिसरात धोकादायक इमारती आहेत. त्याही पूर्णपणे रिकाम्या झाल्या नाहीत. या रहिवाशांना पुनर्वसनाचा प्रश्न भेडसावत आहे. नगर परिषदेच्या परिसरामध्ये ५३ बांधकामे बेकायदा आहेत. याबाबत सिडकोच्या बांधकाम नियंत्रण विभागाशी संपर्क साधला असता, या विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी ई. एम. मेनन यांनी तारांकित प्रश्नांचे उत्तर बनविण्यात विभाग व्यस्त असल्याने सांगून या गंभीर प्रश्नी माहिती देण्याचे टाळले.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jul 2015 रोजी प्रकाशित
सिडको परिसरात बेकायदा माडय़ांचे पेव
तळमजल्यावरून माडी आणि माडीवर चढविलेल्या इतर चार माडय़ा, त्या माडय़ांमधील खोल्यांचे येणारे रोख भाडे आणि या रोख पैशांच्या जिवावर चाळमालकांचे चाललेले अर्थकारण, अशी बेकायदा बांधकामांची चाळसंस्कृती सिडको वसाहतींच्या कुशीमध्ये सध्या पोसली जात आहे.

First published on: 31-07-2015 at 03:34 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cidco takes on political might over razing illegal structures