ऐन उन्हाळाच्या दिवसांमध्ये रबाले, गोठिवली, तळवली, घणसोली,  ऐरोलीमधील वीजपुरवठा मागील चार ते पाच दिवसांपासून वारंवार खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे ऐरोली सेक्टर १५ मधील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर मंगळवारी नागरिकांनी मोर्चा नेऊन सुमारे एक तास ठिय्या आंदोलन करत महावितरणच्या गलथान कारभाराचा निषेध केला. यावेळी काही संतप्त तरुणांनी महावितरणाच्या कार्यालयात गोंधळ घालत कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला होता.घणसोली विभागाचे अधिकारी कुठलीही पूर्वसूचना न देता दुरुस्तीच्या नावाखाली कधीही वीजपुरवठा खंडित केला जात आहे. या संदर्भात नागरिकांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता विद्युतवाहिन्या खंडित झाल्याचे कारण देण्यात येतात. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पाणीपुरवठादेखील वेळेवर होत नसल्याने महिल वर्ग त्रासला आहे. आठवडय़ाच्या प्रत्येक शुक्रवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत विद्युत वाहिन्या दुरुस्ती करण्याकरिता कालावधी दिला जातो. पंरतु महावितरणचे अधिकारी मनमानी कारभार करत वाटेल तेव्हा वीजपुरवठा खंडित करतात. खोदकांमामुळे भूमिगत विद्युत वाहिन्या तुटल्याने पुन्हा वीजपुरवठा सुरळीत करण्याकरिता चार ते पाच तास लागतात. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब मोर्चेकरांनी अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी उपकार्यकारी अभियंता शैलेश कांबळे कार्यालयात उपस्थित नसल्याने कनिष्ठ अभियंता यांच्याकडे या संदर्भातील लेखी निवेदन देण्यात आले. वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढू असा इशारा यावेळी देण्यात आला. या संदर्भात महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शैलेश कांबळे यांना संपर्क साधला असता, नवीन विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. काही दिवसांतच हा वीजपुरवठा पूर्ववत होईल.