सीटू संलग्नित अर्धवेळ स्त्री परिचर कर्मचारी युनियनच्यावतीने सीटू कार्यालयातून जिल्हा परिषदेवर परिचरांच्या मागण्यांसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला. संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर नारे निदर्शने करण्यात आली.
नागपूर जिल्ह्य़ात अंदाजे ३५० अर्धवेळ स्त्री परिचारिकांची एकत्रित वेतनावर २००८मध्ये नियुक्तया करण्यात आल्या. त्या कर्मचाऱ्यांनी एक एप्रिल २०११पर्यंत नियमित कामही केले. या कर्मचाऱ्यांना ११ महिन्याच्या सेवेनंतर एक दिवसाची सेवा खंडित करून पुन्हा कामावर घेण्यात येत होते. असे असतानाही त्यांना एक एप्रिल २०११पासून बेकायदेशीररित्या कामावरून कमी केले. या कर्मचाऱ्यांना पूर्ववत वेतनासह तात्काळ कामावर घ्यावे, अर्धवेळ स्त्री परिचारिकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा.
सामाजिक सुरक्षा योजना लागू करावी, अंशकालीन स्त्री परिचारिकांना १० हजार किमान वेतन द्यावे, वाढीव पगारांची थकबाकी द्यावी, पेंशन योजना लागू करावी आदी मागण्यांचा समावेश मागणीपत्रात होता. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
कार्यक्रमात जिल्ह्य़ातील विविध तालुक्यातील काटोल, नरखेड, पारशिवनी, रामटेक, उमरेड, मौदा, सावनेर, कामठी आदी ठिकाणाहून परिचर मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. निदर्शन स्थळी झालेल्या सभेत संघटनेचे कार्याध्यक्ष व सीटूचे जिल्हाध्यक्ष अमृत मेश्राम, अध्यक्ष शालिनी राऊत, सरचिटणीस शीला आखरे यांनी माहिती दिली.
वत्सला चाफले, अर्चना चपट, कांता खडसे, वंदना मून, सुनीता योगी, सुनंदा बागडे, छाया इंगळे, सत्यफुला काळे आणि दुर्गा माटे आदींचे मोर्चाला सहकार्य लाभले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2014 रोजी प्रकाशित
विविध मागण्यांसाठी परिचरांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा
सीटू संलग्नित अर्धवेळ स्त्री परिचर कर्मचारी युनियनच्यावतीने सीटू कार्यालयातून जिल्हा परिषदेवर परिचरांच्या मागण्यांसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला.
First published on: 20-02-2014 at 12:10 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citu medical attendant agitation on zp office