झणझणीत सावजीच्या रस्स्यावर ताव मारायला नागपुरात पुण्या-मुंबईहून खवय्ये येतात. अस्सल खवैय्या असेल आणि नागपुरात आल्यावर सावजीवर त्याने ताव मारला नसेल तर नवलच! सावजीसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूरकरांना आता प्रथमच सावजीहून वेगळे नवे काही चाखायला मिळेल तर त्यावरही तो ताव मारायला मागेपुढे पाहणार नाही. जेवढा दर्दी तो कलेचा, तेवढाच तो खाण्याचाही! अशाच नागपूरकरांसाठी जेव्हा ‘सीकेपी खासीयत’ची मेजवानी आयोजित केली गेली, तेव्हा पहिल्याच दिवशी या मेजवानीवर पडलेल्या त्यांच्या उडय़ा ‘दर्दी खवैय्या असावा तर असा!’ अशी दाद मिळवून गेला.

भारवा पापलेट.. सोबतीला कोलंबीची खिचडी. सोलाची खिचडी.. उकडीचे मोदक. वालाचे बिऱ्हडं अनं् वालाचीच खिचडी! असा खमंग मेनू डोळ्यासमोर आला आणि भूक बळावली नाही तर नवलच! कळतच नाही आधी बोंबिल फ्रायवर ताव मारावा की सोडय़ाच्या खिचडीवर. शाकाहारीवर ताव की मांसाहारीवर. पर्याय दोन्हीही उपलब्ध असल्याने दोघांचीही भूक शमविण्याची उत्तम व्यवस्था ‘सीकेपी खासीयत’च्या खाद्यपदार्थामध्ये आहे. ‘सीकेपी खासीयत’च्या संस्कृतीशी ओळख असली तरी खाद्यपदार्थावर ताव मारायची चांगली संधी नागपूरकरांपर्यंत चालून आली आहे. ‘मेट्रोपॉलिटन सिटी’ अशी ओळख असलेल्या नागपुरात दर्दीची कमतरता नाही. तो दर्दी नाटकाचा आहे, तो दर्दी गाण्यांचा आहे, तो दर्दी खेळांचा आहे आणि तो दर्दी खाण्यांचासुद्धा आहे. सांस्कृतिक मेजवानी या नागपूरकरांना नेहमीच मिळते, पण अस्सल सावजीचा बाज असलेला नागपूरकर आता सावजी आणि पंजाबीच्या मधली चव ‘सीकेपी खासीयत’च्या पापलेट, बोंबिल, कोलंबीवर पडत आहेत. काश्मिरी पदार्थाच्या चवीशी साधम्र्य साधणारे हे ‘सीकेपी खासीयत’चेपदार्थ नागपूरकरांसाठी नवे असले तरी चाखण्यासाठी तो सज्ज झाला आहे. चायनीज पदार्थाला सरावलेली तरुणाई अस्सल खाद्यांना विसरत चालली आहे. अशावेळी आपले ‘फूड कल्चर’ त्यांनी विसरता कामा नये म्हणून ‘फूड फेस्टिवल’च्या माध्यमातून ते त्यांच्यापुढे आणण्याचा पर्याय नवा नसला तरी परिणामकारक नक्कीच आहे.
चिटणवीस सेंटरमधल्या तीन दिवसांच्या ‘सीकेपी खासीयत’ फूड महोत्सवावर पहिल्या दिवशीपासूनच नागपूरकरांनी पसंतीची मोहर उमटवली. इथं येणारा वर्ग हा पन्नाशीच्या वरचाच अधिक! त्यामुळे सुरुवातीला थोडं अचंभित व्हायला होतं, पण नंतर पुन्हा आठवते तो दर्दी नागपूरकर! सावजीला सरावल्यानंतर मांसाहरी पदार्थ झणझणीत नसेल तर तोंडात जाणार का हा मूळ प्रश्न, पण आज त्या प्रश्नाचेही उत्तर मिळाले. खाण्याचा दर्दी असेल तर तो सावजीच काय, पण ‘सीकेपी खासीयत’ पदार्थावरही तेवढय़ाच ताकदीने ताव मारेल. या पदार्थाच्या मेजवानीसाठी मुंबई आणि कोकणातून मासे बोलावले जात आहेत. अगदी दहा रुपयांपासून तर २५० रुपर्यापर्यंतचा पर्याय खवैय्यांसाठी खुला आहे. भाताचेच जवळजवळ चार प्रकार, मास्यांचे आठ प्रकार, उकडीचे मोदक, सोलकढीसोबतच वालाचं बिऱ्हडं आणि वालाची खिचडी अशीही मेजवानी खवैय्यांसाठी आहे. ‘सीकेपी खासीयत’ पदार्थामध्ये घुसखोरी करून वैदर्भीय भाकरीने तिच्याशिवाय जेवणच अपूर्ण असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे ‘सावजीच्या दर्दी नागपूरकरांनो, तीन दिवस सीकेपी पदार्थावरही ताव मारा’ असे सांगण्याची गरजच पहिल्या दिवशीची गर्दी पाहिल्यानंतर राहिली नाही.