इचलकरंजी शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत चालल्याने मुख्याधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी पहाटे पुन्हा एकदा विविध भागात प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी कामावर वेळेवर हजर नसणे, गणवेश नसणे यांसह विविध कारणावरून सहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य निरीक्षक सूर्यकांत चव्हाण, बापू सातपुते, मंगेश दुरु डकर, रवींद्र लोखंडे तर विभागी निरीक्षक संदीप मधाळे व डॉ. अशोक जाधव यांचा समावेश आहे. तर वॉर्ड क्रमांक २० मधील मक्तेदाराकडून समाधानकारक स्वच्छता होत नसल्याने मक्तेदारासही नोटीस बजावण्याचा निर्णय मुख्याधिकाऱ्यांनी घेतला आहे.
आरोग्य विभागातील अनेक कर्मचारी निवृत्त झाल्याने अपुऱ्या संख्येमुळे काही भागात खाजगी मक्तेदारामार्फत कचरा उठाव आणि स्वच्छता केली जाते. मात्र मक्तेदारांना त्यांच्या कामाचे देयक वेळेत मिळत नसल्याने नव्याने काम करण्यास मक्तेदार तयार नाहीत. त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडत चालला आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने उपलब्ध कर्मचारी आणि मक्तेदारामार्फत शहर स्वच्छतेची मोहीम राबवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
स्वच्छतेबाबत कडक भूमिका घेऊन मुख्याधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन कामात हयगय करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला होता. पण त्याची कसलीही अंमलबजावाणी प्रत्यक्षात होत नसल्याचा प्रत्यय त्यांना आजच्या भेटीत आला. आजच्या भेटी वेळी पालिकेने ठरवून दिलेल्या वेळेत आणि गणवेशात कामावर हजर नसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2012 रोजी प्रकाशित
इचलकरंजीतील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर
इचलकरंजी शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत चालल्याने मुख्याधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी पहाटे पुन्हा एकदा विविध भागात प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी कामावर वेळेवर हजर नसणे, गणवेश नसणे यांसह विविध कारणावरून सहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.
First published on: 19-12-2012 at 09:23 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cleanliness in ichalkaranji is serious matter