गजबजलेल्या सीताबर्डीतील एका दुकानाला लागलेल्या आगीत विक्रीसाठी ठेवेलेले कापड जळून नष्ट झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन आग विझवल्याने अनर्थ टळला. या आगीत ३० लाख रुपये किमतीचे कापड जळून नष्ट झाल्याचा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.
सीताबर्डी मुख्य मार्गावर विदर्भ कापड बाजार हे दुकान आहे. दुपारी १२ वाजताच्या सुमारास या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून धूर निघताना दिसल्याने परिसरात धावपळ उडाली. बघता बघता दुसऱ्या मजल्यावरील कापडांनाही आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १० बंब व ६० जवान घटनास्थळी आले. जवानांनी पाण्याचा मारा करून आग विझवली. ही इमारत गुलाबचंद चांडक यांच्या मालकीची आहे. तीन मजली इमारतीत विदर्भ कापड बाजार, चांडक कटपीस सेंटर आणि नागपूर विणकर सोसायटीचे कापडाचे दुकान आहेत. आग शार्ट सर्किट झाल्याने लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीमध्ये काही कापड जळाले तर काही कापड पाण्याने भिजून खराब झाले.
या इमारतीला बाहेरून प्लास्टिक लावले असल्याने आग आणखी भडकली. आगीवर पाण्याचा मारा करण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना इमारतीची तावदाने फोडावी लागली. या इमारतीच्या एका बाजूला इंडियन ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट आहे. आग लागली तेव्हा येथे वर्ग सुरू होता. लगेच वर्गातील २५ विद्यार्थ्यांना खाली उतरवण्यात आले. या आगीत दुकानातील ८० टक्के साडय़ा व २० टक्के सलवार सूट व अन्य कापड जळाले. जवळपास ३० लाखांची हानी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असला तरी यापेक्षा जास्त नुकसान झाले असावे, असे बोलल्या जात आहे. आग विझवण्यासाठी जवानांना दोन तास परिश्रम घ्यावे लागले.