ग्रामीण भागात प्रथमच सुटे नाणी देणारे मशीन स्टेट बँकेने बसवले असून त्यामुळे सुटय़ा नाण्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना मात्र चांगलाच दिलासा मिळणार आहे, अशी माहिती शाखा अधिकारी सुरेंद्र चौरे यांनी दिली.
कर्जतसह तालुक्यात सुटय़ा नाण्यांची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून कोणताही व्यवहार करताना सुटे पैसे नसल्याने ग्राहक व व्यापारी या दोघांची मोठी गैरसोय होत होती. एसटी प्रवासात तर बऱ्याच वेळा सुटे पैसे नसल्याने वाहकाबरोबर प्रवाशांच्या बाचाबाचीचे प्रसंग अनेक वेळा घडत असतात.
कर्जत येथील स्टेट बँकेच्या शाखेत या समस्येवर शाखा अधिकाऱ्यांनी तोडगा काढला आहे. त्यांनी बँकेच्या प्रवेशव्दारातच सुटे पैसे देणारे मशीन बसवले असून १० रूपयांची नोट टाकताच दोन रूपयांची पाच नाणी बाहेर पडतात. या मशीनचे
उद्घाटन शाखाधिकारी चौरे यांच्या हस्ते झाले. यावेळी रोखपाल एच. आर. कदम, संजीवनी बर्डे, व इतर कर्मचारी उपस्थित होते. ग्रामीण भागात अशा प्रकारे सुविधा सुरू झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.