महाविद्यालयीन महोत्सव म्हटले की, धम्माल, मस्ती, नाच, गाणी असे चित्र आपल्या डोळय़ासमोर येते. पण या चित्राला संकल्पनांना छेद देत काही महाविद्यालयांमध्ये समाजिक भान जपणारे महोत्सव साजरे केले जातात. डिसेंबर महिन्यात अशा महोत्सवांची रेलचेल पाहवयास मिळणार आहे. 

प्रत्येक महाविद्यालयाचा स्वत:चा एक स्वतंत्र सांस्कृतिक महोत्सव साधारणपणे असतोच. या महोत्सवांमध्ये सामाजिक आशय पूर्वीही असे. परंतु महोत्सवाच्या अन्य धामधुमीत समाजिक आशयाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष फारसे जात नसे. यामुळेच काही महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन सामाजिक भान जपणारे स्वतंत्र महोत्सव सुरू केले. यामध्ये महाविद्यालयांनी एनएसएससारख्या विभागांची मदत घेतली आहे.
चर्चगेट येथील के. सी. महाविद्यालयाचा ‘आनंदोत्सव’ ५ नोव्हेंबर रोजी पार पडला. ‘स्त्रीला सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार’ ही या महोत्सवाची मुख्य संकल्पना होती. या महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून कॅन्सरग्रस्त रुग्ण, बॉम्बे आणि टाटा रुग्णालयांतील परिचारिका, महिला ट्रॅफिक पोलीस अशांना बोलावण्यात आले होते. या सर्व महिलांसोबत काही खेळांचे आणि चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. याचबरोबर रक्त तपासणी शिबीर आणि प्लेटलेट्स नोंदणी शिबीरही आयोजित करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे प्राध्यापक सतीश कोलते यांनी सांगितले.
या पाठोपाठ राज्यातील सर्व विद्यापीठांतील १८ विद्यार्थ्यांचा संघ राज्य स्तरावर होणाऱ्या ‘उत्कर्ष’च्या तायारीला लागले आहेत. या महोत्सवात एक सामाजिक प्रश्न घेऊन त्याभोवती विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात, असे राज्याचे एनएसएस विभागाचे प्रमुख डॉ. अतुल साळुंखे यांनी सांगितले. यात निबंधलेखन, वाद-विवाद स्पर्धा, पथनाटय़ स्पर्धा आदींचा समावेश असतो. यंदा हा महोत्सव औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १५ ते १७ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. जानेवारी महिन्यात परळच्या महर्षी दयानंद महाविद्यायात ‘स्फूर्ती’ या आंतरमहाविद्यालयील सामाजिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्येही विविध सामाजिक मुद्दय़ांवर आधारित स्पर्धाचे आयोजन करण्यात येत असल्याचे महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे प्रा. अविनाश कारंडे यांनी सांगितले.
अशा महोत्सवांमुळे विद्यार्थ्यांचा विविध सामाजिक प्रश्नांचा अभ्यास अनायसे होते. या प्रश्नांची जाणीव झाल्याने त्यातील काही जण या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पुढे येतात. यामुळे या महोत्सवाचे विशेष महत्त्व निर्माण झाले आहे.