लोकसभा निवडणुकीची तारीख अवघ्या काही दिवसांवर आली असताना जिल्हा निवडणूक शाखेत विविध कामांनी वेग घेतला आहे. पुरवणी मतदारयाद्यांचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या दोन दिवसांत ते राजकीय पक्ष व बुथ यंत्रणेच्या स्वाधीन केल्या जाणार आहेत. मतदारयादीचे गठ्ठे जिल्हाधिकारी कार्यालयातील वेगवेगळ्या विभागात ठेवले गेल्यामुळे या परिसरात गठ्ठेच गठ्ठे चोहीकडे..असे दृश्य नजरेस पडते. दुसरीकडे, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आवश्यक साहित्य तसेच मनुष्यबळाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची आकडेवारी अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही. आकडेवारीचा घोळ आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे कामांचा ताळमेळ बसविण्यात अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे.
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा निवडणूक शाखेने आपला मोर्चा आता मतदारयाद्यांचे काम पूर्ण करण्याकडे वळविला आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हा निवडणूक शाखेस नाशिक व दिंडोरी मतदारसंघातील मतदारांच्या पुरवणी याद्या तसेच मूळ याद्या प्राप्त झाल्या. त्या वेळेत बुथनिहाय कर्मचारी व राजकीय पक्षांना देता याव्यात, यासाठी सध्या १०० हून अधिक कर्मचारी उन्हाची पर्वा न करता दिवस-रात्र काम पूर्ण करण्यात दंग आहेत. मतदारसंघातील विभागनिहाय याद्यांची आवश्यक ती छाननी करून गठ्ठे बांधण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस हे काम सुरू असल्याने सर्वत्र गठ्ठय़ांचे साम्राज्य आहे. काही ठिकाणी तर हे काम कार्यालयाच्या बाहेरील आवारात सुरू आहे. बाहेर पडलेल्या मतदारयाद्यांचा कोणाकडून गैरवापर होऊ नये, यासाठी तपासणी पूर्ण झालेल्या गठ्ठय़ांची रवानगी विविध विभागांत केली जात आहे. मात्र, उपरोक्त विभाग आधीच महत्त्वाची कागदपत्रे, फाइल्स आदी असताना त्यात आता हे गठ्ठे आल्याने कर्मचाऱ्यांना बसण्यास जागा राहिलेली नाही. जिकडे-तिकडे केवळ मतदारयाद्यांचे गठ्ठे दृष्टिपथास पडतात. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या टेबलावर सध्या १५ ते २० गठ्ठे असल्याने त्यांना दैनंदिन काम करताना ‘द्राविडी प्राणायाम’ करावा लागत आहे. वरिष्ठांकडून फेरफटका मारताना गठ्ठय़ांसाठी आणखी कुठे मोकळी जागा मिळते का, याची पाहणी होत असल्याने कर्मचारी वैतागले आहे. नाशिक पूर्व व पश्चिमच्या मतदारयाद्यांचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या दोनतीन दिवसांत प्रमुख राजकीय पक्षांच्या मागणीनुसार तसेच सर्व मतदान केंद्रांवर याद्या लावल्या जातील असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान साहित्य व मनुष्यबळाची वाहतूक करण्यासाठी किती वाहने अपेक्षित आहे, याचा नेमका अंदाज अद्याप वाहन अधिग्रहण कक्षालाच आलेला नाही. वेळोवेळी होणाऱ्या मागण्यांमुळे हा विभाग अजूनही आकडय़ांच्या गोंधळात अडकलेला आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत तयार अहवालात मतदानाच्या दिवशी ७७६ वाहनांचा ताफा मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी लागणार असल्याचे म्हटले आहे. त्यात ४१९ बस, २७ छोटय़ा बस, २६ टेम्पो आणि ३०४ जीप यांचा समावेश आहे. गरज पडल्यास काही खासगी प्रवासी वाहनांची मागणी वेळेवर करण्यात येणार आहे. वाहन व्यवस्थेसाठी निवडणूक शाखेचे लाखोहून अधिक रुपये खर्च होणार असून प्रादेशिक परिवहन विभागाकडे अनामत रक्कम म्हणून ३९ लाख रुपये जमा करण्यात येणार आहे. बसेस तसेच छोटय़ा बसेस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ देणार असून चारचाकी खासगी वाहने ही सरकारी-निमसरकारी कार्यालयातून मागविण्यात आली आहे. गरज पडल्यास खासगी वाहने ही प्रादेशिक परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या दराने भाडय़ाने घेतली जाणार आहेत.