स्थानकांच्या फलाटांवर उशिराने धावणाऱ्या लोकल गाडीची वाट पाहाणे आणि रडतखडत धावणाऱ्या ‘जीवन वाहिनी’त स्वतचे जगणे शोधणे हा ठाणेपल्याड राहाणाऱ्या लक्षावधी रेल्वे प्रवाशांच्या आयुष्याचा एक भागच बनून बसला आहे. मुंबईतील घर परवडत नाही म्हणून कल्याण-डोंबिवलीची वाट धरणाऱ्या रहिवाशांना मुंबईतील रोजीरोटीसाठी दररोज लोकलचा प्रवास अनिवार्य असतो. कितीही घोषणा झाल्या तरी इतक्या वर्षांत मुंबईपासून डोंबिवली, कल्याणपर्यंत मेट्रो अथवा मोनोसारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्थेचे स्वप्न अद्याप कागदावरही उतरलेले नाही. गेल्या सहा महिन्यांत अगदी फुटकळ कारणे पुढे करत डोंबिवली-छत्रपती शिवाजी टर्मिनस या मार्गावर धावणाऱ्या तब्बल लोकल गाडीच्या तब्बल चार हजार फेऱ्या रद्द झाल्या असून फलाटांवरील सिग्नलचा लांबलेला लाल दिवा हा प्रवाशांच्या जगण्याचा भागच बनू लागला आहे.
नवीन वर्षांचे पहिले काही दिवस नियमित कार्यालयात जाऊ म्हणून संकल्प सोडलेल्या अनेक चाकरमान्यांचा ठाकुर्ली जवळ लोकलचा तुटलेला पेंटोग्राफ आणि दिवा रेल्वे स्थानकात झालेल्या दगडफेक घटनेमुळे हिरमोड झाला. मुंबई गाठण्यासाठी कर्जत, कसाऱ्यापासूनचे पहाटे तीन वाजल्यापासून घर सोडलेले प्रवासी मुंबई गाठण्यासाठी  लोकलचा पर्याय निवडतात. असे असताना ही जीवन वाहिनी दिवसाआड दगा देत असल्याने चाकरमान्यांचा सहनशक्तीचा अंत होत चालला आहे. ‘आम्ही काहीच करू शकत नाही हे प्रभू (परमेश्वरा) तूच आमचा प्रवास सुखकर कर’ असे आर्जव आता हे प्रवासी करू लागले आहेत.  
कर्जत-खोपोली, कसारा या सव्वाशे किलोमीटर अंतरावरील प्रत्येक नागरिक गावच्या रेल्वे स्थानकात येणाऱ्या लोकलमधून मुंबईच्या दिशेने प्रवास करतो. तेथूनच परतीच्या मार्गाला लागतो. कसारा, कर्जतकडून मुंबईला जाणारी सकाळच्या वेळेतील एक
लोकल रद्द झाली तर, या लोकलमधून मुंबईला प्रवास करणाऱ्या दूध विक्रेत्याचे चार ते पाच हजार रुपयांचे एका दिवसाचे नुकसान होते. कर्जत, कसारा भागांतील अनेक दूध विक्रेते अनेक वर्षांपासून किटलीतून सकस दूध मुंबईत विकतात. लोकल प्रवास हाच त्यांचा एकमेव मार्ग आहे. हेच त्यांचे उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. याशिवाय घरगुती मसाले, वस्तू विकणारे अनेक विक्रेते या भागातून दररोज मुंबईत सकाळच्या वेळेत येतात. मुंबईला निघण्यापूर्वी हे विक्रेते पहाटे तीन ते चारच्या दरम्यान घर सोडतात. तत्पूर्वी म्हशीचे दूध काढलेले असते. ते दुपारी बाराच्या आता ग्राहकाला देणे गरजेचे असते. सकाळची एक लोकल रद्द झाली की जवळच्या रेल्वे स्थानकातील भागात या दूध विक्रेत्यांना कमी दरात दूध विक्री करून घरी जावे लागते. एक लोकल रद्द झाली तर मंत्रालयात, कॉर्पोरेट कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला जो मन:स्ताप होतो त्याचप्रमाणे आम्हालाही आर्थिक नुकसान सहन करीत घरी जावे लागते, असे विक्रेत्यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरात साडेचार हजारांहून अधिक वेळा लोकलच्या फेऱ्या रद्द झाल्याची माहिती यापूर्वीच पुढे आली आहे. मेगाब्लॉक, पेंटोग्राफ तुटणे, म्हशींचे कळप रेल्वे मार्गातून जाणे, अपघात आदी कारणांमुळे या लोकल रद्द झाल्याची माहिती आहे. ठाणेपल्याड स्थानकावर अनेक ठिकाणी रेल्वेची फाटके आहेत. स्थानिक महापालिका प्रशासन आणि रेल्वे यांची गणिते सुटत नसल्याने ही फाटके बंद करण्यासाठी उभारण्यात येणारे उड्डाण पुलांचे प्रश्न रेंगाळत पडले आहेत. कर्जत, कसारा ते दिवापर्यंत रेल्वे मार्गाच्या दुतर्फा अनेक फाटके आहेत. ही फाटके बंद केली तर स्थानिक भागात ये-जा करण्याचे मार्ग उपलब्ध होतील आणि होणारे जनावरे, पादचाऱ्यांचे अपघात टळतील असे सांगण्यात येते.