मांढरदेव येथील काळूबाईच्या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून यावर्षी तीन ते पाच दिवस यात्रा भरेल. शुक्रवारपासून यात्रेला सुरुवात होईल.
मांढरदेव येथील काळूबाईची यात्रा २७ व २८ जानेवारीला पौष पौर्णिमेला भरणार आहे. यावर्षी २६ व २७ रोजी पौर्णिमा विभागून आलेली आहे. तर दि. २८ सोमवारी उत्तरयात्रा आहे. शुक्रवार दि. २५ मंगळवार, दि. २९ हे देवीचे वार असल्याने यात्रा विभागून भरेल असा अंदाज आहे.
यात्रेची तयारी पूर्ण झाली असून सुरक्षेच्या दुष्टीने पोलीस यंत्रणा सतर्क आहे. मंदिरापासून किमान २ किमी. अंतरावर नेहमीप्रमाणे दुचाकी, चारचाकी गाडय़ांची पारर्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. लगतच एस.टी.चे पिकअप शेड उभारण्यात आले आहे. एका वेळी किमान १०० ते १२५ बसेस उभ्या राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विहिरीपासून मंदिराकडे फक्त ट्रस्टी व व्हीआयपींची व अधिकाऱ्यांची वाहने जातील. लिंबू, बिब्बे, बाहुल्या यांची विक्री करण्यावर बंदी घातली आहे. भक्तांना, मंदिर दर्शन व कळस दर्शनाची वेगवेगळी बॅरीकेटींग उभारण्यात आली आहेत. डोक्यावर देवीचा मुखवटा घेऊन येणाऱ्यांसाठी वेगळी दर्शनरांग करण्यात आली आहे. अंगात येणाऱ्यांवर सोबतच्या लोकांनी लक्ष ठेवावे असे बंधन करण्यात आले आहे.
नारळ फोडण्यास, तेल घालण्यास, कापूर जाळण्यास बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवार दि. २५ ते मंगळवार दि. २९ पर्यंत विभागून पाच दिवस यात्रा भरेल असे नियोजन ठेवण्यात आले आहे.