महाराष्ट्र शासनाने आधार कार्डला अतिशय महत्व दिल्याने आधार कार्ड के द्रांवर नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळत आहे. प्रशासनाने १ जून ते ३० जूनपर्यंतची मुदत दिल्याने जळगाव जामोद तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनीही येथील संत रूपलाल महाराज पालिका शाळेत गर्दी केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिस प्रशासनाला पाचारण करण्यात आले.
जळगाव जामोद विभागाचे आधार कार्ड काढण्यासाठी विक्रांगी कंपनी मुंबईला नेमण्यात आले आहे. कंपनीने स्थानिक संत रूपलाल महाराज मराठी शाळा क्रमांक १ मध्ये चार मशिनधारक शहरासाठी नेमले असून आधारकार्ड काढण्याची कार्यालयीन वेळ सकाळी १० ते दुपारी ५ आहे. परंतु, नागरिकांची गर्दी पाहता हा वेळ पुरेसा नाही. यामुळे सकाळपासून रांगेत उभे राहणाऱ्या शेकडो नागरिकांना परत जावे लागत असल्याने त्यांचा वेळ व रोजीरोटी बुडत आहे. तसेच या  केंद्रावरील चार मशिनपैकी एक मशिन बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. रोज रोज उन्हात रोजी पाडूनही आधारकार्डचे काम पूर्ण होत नसल्याने काही संतप्त नागरिकांनी रोष व्यक्त केला. यामुळे या केंद्रावर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच तत्काळ याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून संतप्त नागरिकांना शांत केले.
आधार कार्ड काढण्याची शासनाने दिलेली एक महिन्याची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिक व शेतकरी बांधवांकडून होत आहे. तसेच वेळेत बदल करून ती सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत करण्यात यावी, आधार कार्ड काढण्यासाठी कर्मचारी व कॉम्युटर मशिनही वाढविण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. नागरिक व शेतकऱ्यांच्या या मागणीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
हे काम येथील महसूल विभागाकडे देण्यात आल्याचे समजते. मात्र, एकदाही तहसीलदार या केंद्रावर फिरकले नाही. नागरिकांची होणारी हेळसांड आणि आधार केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून होत असलेली मनमानी याकडे महसूल विभागाचे कोणतेच लक्ष नसल्याचे दिसून येते.