लोकोपयोगी कामांमुळे जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले जिल्हाधिकारी सच्चिंद्रप्रताप सिंह यांच्या अकस्मात बदलीविरोधात आंदोलन व बेमुदत उपोषणाचे अस्त्र उचलून ‘एकला चलो रे ची धमक’ सुलभा हटवार यांनी दाखविली. त्या युवक काँग्रेसच्या तुमसर विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेल्या एकमेव महिला अध्यक्ष आहेत. आपण लोकभावनेची कदर करतो, हे त्यांनी स्वत:च्या कृतिशीलतेने दाखवून दिले. न्याय्य कामात पक्षशिस्तीच्या बागुलबुवालाही त्यांनी जुमानले नाही.
आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांच्यासोबत एन.एस.यू.आय.च्या जिल्हाध्यक्ष मधुश्री गायधने आहेत. गायधने यासुद्धा महाराष्ट्रातून जिल्हाध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या एकमेव महिला आहेत. बदलीविरोधात भंडाऱ्यात कृती समितीने मोठय़ा प्रमाणात आंदोलन पेटविले होते; परंतु ते नेतृत्वाअभावी लवकरच विझले. मात्र, सुलभा हटवार यांनी आपल्या युवक कार्यकर्त्यांना घेऊन उपोषणाच्या तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या नावे बदली रद्द करावी, याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. त्यानंतर उपोषणाचे पाऊल उचलले. त्यांचे म्हणणे आहे की, राहुल गांधी यांनी ‘काँग्रेस का हाथ, आम आदमी के साथ’ हा नारा दिला. त्याप्रमाणे जिल्ह्य़ात आम आदमींची कामे होऊ लागली होती. त्याचे काँग्रेसला सोयरसुतक नाही, असे दिसते. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाऱ्यांचा लाभ होईल, असे काम केले नाही. निवडणूक काळातही ते पुढाऱ्यांच्या अवैध धंद्यात कामी आले नसते. हीच त्यांची चूक आहे काय, असाही प्रश्न त्यांनी विचारला. या जिल्हाधिकाऱ्यांमुळे अधिकारी व कर्मचारी कामास लागला होता. जिल्ह्य़ात निश्चित विकासाचे पाऊल पडत आहेत, असा विश्वास निर्माण झाला होता; परंतु आता त्याला खीळ बसली आहे. सामान्य नागरिक निश्चितच या बदलीमागे असणाऱ्यांना माफ करणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्याचा हक्क आहे. त्यांनी आमदार, खासदारांचे कदाचित ऐकलेही असेल; परंतु ही भंडारा जिल्ह्य़ातील सामान्य जनतेची मात्र प्रतारणा झाली. त्या म्हणाल्या, उपोषण सोडून द्यावे, अशा सूचना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून येत आहेत. बदली थांबली तर तुमचा काय फायदा़, असेही बोलले जात आहे. सध्या सर्वच राजकीय पक्षांनी लोकभावना लक्षात न घेता कोणतेही आंदोलन न करण्याचे ठरविलेले दिसते. जिल्ह्य़ात तशीही सर्वच पक्षात कृतिशीलतेची कमी आणि त्यातच युवक कार्यकर्त्यांना मागे खेचण्याचे प्रयत्न निश्चितच जिल्ह्य़ाकरिता योग्य राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
त्यांचे वक्तव्य, त्यांनी दाखविलेले धाडस आणि पक्षातील वरिष्ठांचा नाकर्तेपणा बघता मोठमोठय़ांना जे जमले नाही ते एका युवतीने करून दाखविले. बदली रद्द होवो की न होवो, या युवतीने व तिच्या युवक सहकाऱ्यांनी काँग्रेसची धग अजून संपली नाही, हे या प्रकरणातून स्पष्ट केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jul 2013 रोजी प्रकाशित
सुलभा हटवार यांच्या कृतिशीलतेने काँग्रेसची ‘धग’ कायम
लोकोपयोगी कामांमुळे जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले जिल्हाधिकारी सच्चिंद्रप्रताप सिंह यांच्या अकस्मात बदलीविरोधात आंदोलन व बेमुदत उपोषणाचे अस्त्र उचलून ‘एकला चलो रे ची धमक’ सुलभा हटवार यांनी दाखविली.
First published on: 17-07-2013 at 09:49 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress activist sulbha hatwar goes on hunger strike against district collector