जिल्हा काँग्रेसमधील गटबाजी, पक्षाची जिल्ह्य़ातील मरणासन्न अवस्था आणि जिल्हाध्यक्ष बदलण्याची वारंवार होत असलेली मागणी या सर्वाचा विचार करून जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड. संदीप पाटील, तर महानगर अध्यक्षपदी डॉ. अर्जुन भंगाळे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षात कोणीच कोणाचे ऐकण्याच्या स्थितीत नसताना टाकण्यात आलेली जबाबदारी पाटील यांच्यासाठी एक आव्हान आहे.
जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे भाचे उदय पाटील, तर महानगर अध्यक्षपदी सलीम पटेल कार्यरत होते. तथापि, गटबाजी रोखण्यात आलेले अपयश, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकांमध्ये पक्षाची झालेली गलितगात्र अवस्था, पक्ष बांधणीतील अपयश या पाश्र्वभूमीवर या दोघांना पदावरून डच्चू देण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी चोपडय़ाचे नगराध्यक्ष तथा माजी मंत्री शरदचंद्रिका पाटील व माजी आमदार डॉ. सुरेश पाटील यांचे पुत्र अ‍ॅड. संदीप पाटील यांना जिल्हाध्यक्ष म्हणून तर जळगावचे माजी उपनगराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे यांना महानगर अध्यक्ष म्हणून संधी दिली आहे.
जळगाव जिल्हा काँग्रेसमधील प्रचंड गटबाजीमुळे पक्षाची पार वाताहत झाली आहे. वर्षांनुवर्षे जिल्हा परिषदेत सत्ता असलेल्या काँग्रेस सदस्यांची संख्या कमी आहे. तर जळगाव पालिका व महापालिकेत दोन दशकांपासून काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. केंद्र आणि राज्यात सत्ता असलेल्या काँग्रेसचा जिल्ह्य़ात एकही आमदार व खासदार निवडून येऊ शकलेला नाही. पक्षांतर्गत गटबाजीचा हा फटका असल्याचे स्पष्ट झाले आहे. तत्कालीन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रा. व्ही. जी. पाटील यांच्या हत्येनंतर जिल्हा काँग्रेसमध्ये गटबाजी मोठय़ा प्रमाणात फोफावली. त्यातच माजी जिल्हा अध्यक्ष डॉ. जी. एन. पाटील यांच्या मुलालाच अध्यक्षपद बहाल केले गेल्याने व्ही. जी. पाटील गटाचा विरोध अधिकच वाढला. त्यातून पाडापाडीचे राजकारण खेळले गेले. त्यामुळे जिल्ह्य़ात पक्षाची वाताहत झाल्याचे ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते सांगतात. नवीन जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील हे कोणत्याच गटातटाशी संबंधित नाहीत.
चार जिल्हाध्यक्षांच्या कार्यकाळात त्यांनी उपाध्यक्षपद भूषविले आहे. २०११ पासून ते चोपडय़ाचे नगराध्यक्ष असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर पक्षातील सर्वाना सोबत घेऊन पक्षाला बळकटी प्राप्त करून देण्याचे आव्हान पाटील यांच्यासमोर आहे.