राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाला झालेल्या लाखोंच्या गर्दीवरून काँग्रेस खासदार, आमदार, नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये हेवेदाव्यासोबत श्रेय घेण्याची धडपड सुरू झाली आहे. सभा आटोपताच ‘आकडय़ा’चे गणित सुरू झाले असून प्रत्येकजण आमच्यामुळे गर्दी झाली असे दावे करीत आहे.
सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत राजीव गांधी जीवनदायी योजनेचा शुभारंभ झाला. सोनिया गांधी येणार असल्यामुळे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त गर्दी जमविण्यासाठी प्रत्येक मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना टार्गेट देण्यात आले होते. एका गावातून किमान दोन ते अडीच हजार लोक सभेसाठी आले पाहिजे असे आदेश देऊन त्या त्या गावातील प्रमुख कार्यकर्त्यांवर जिल्ह्य़ातील आमदार आणि खासदारांनी जबाबदारी दिली होती. राज्य परिवहन विभागाच्या बसेस लोकांना आणण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्य़ातून आणि शहरातील विविध भागातून मोठय़ा प्रमाणात लोक सभास्थळी आले होते. एकीकडे नेत्यांच्या चेहऱ्यावर समाधान असले तरी नेत्यांमध्ये राजकारण सुरू झाले आहे. नरेश पुगलिया, नितीन राऊत, राजेंद्र मुळक, संजय देवतळे, विजय वडेट्टीवार, रावसाहेब शेखावत, दिलीप सानंदा, गोपालदास अग्रवाल, अनिस अहमद, दीनानाथ पडोळे, वसुधाताई देशमुख आदी नेत्यांनी त्यांच्या जिल्ह्य़ातील लोक मोठय़ा संख्येने आल्याचे दावे केले. सभास्थळी रोहयो मंत्री नितीन राऊत यांच्या काही कार्यकत्यार्ंनी सर्वात जास्त लोक हे उत्तर नागपुरातील असल्याचा दावा करून घोषणा देणे सुरू केले. प्रफुल्ल पटेल यांनी नितीन राऊत यांचे नाव न घेतल्याने एका समर्थकाने भाषण सुरू असताना राऊत यांचे नाव घ्या, असा आवाज दिला.    
 गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्य़ातून मोठय़ा प्रमाणात लोक या कार्यक्रमाला उपस्थित असल्याची चर्चा परिसरात होती. माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी खासदार नरेश पुगलिया यांची छायाचित्रे असलेले बिल्ले अनेकांजवळ दिसून आले. शहरापेक्षा ग्रामीण भागातील नेत्यांनी जास्त गर्दी जमविली असल्याचे दावे उमरेड आणि भिवापूरमधील काही प्रमुख कार्यकर्ते करीत होते. सभास्थळी काही आमदार आणि नगरसेवक आम्ही आमची जबाबदारी पार पाडली असल्याचे बोलत होते. मी वस्तीतून दोन हजार लोक आणले तर काही मंत्री आणि आमदार जिल्ह्य़ातून पाच ते सहा हजार लोक असल्याचे सांगत होते. शहरामध्ये काँग्रेसमधील दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांना शहरातील विविध भागातून लोकांना सभास्थळी आणण्याचे काम देण्यात आले होते, मात्र त्यातील काहींना ते शक्य झाले नाही. सोनिया गांधी सभास्थळी येताच त्यांनी संख्येचा आढावा घेणे सुरू केले होते. कोणी म्हणे एक लाखापेक्षा जास्त आहे तर कोणी दीड ते दोन लाख लोक असल्याचे सांगत होते. अनेक पदाधिकारी गर्दी जमविण्याच्या भानगडीत न पडता त्यांनी स्वतचे छायाचित्र असलेले होर्डिग आणि बॅनर लावून पक्षामध्ये सक्रिय असल्याचे दाखवून दिले आहे.