शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काल मुंबईत आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागणी झाल्यास काँग्रेसला शिर्डीच्या जागेचा आग्रह सोडावा लागेल, असे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केल्याचे पक्षातील सूत्रांकडून समजले.
राज्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या नऊ मतदारसंघांत काँग्रेसला पराभव पत्कारावा लागला, त्याचा मतदारसंघनिहाय आढावा मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष संयुक्तपणे घेत आहेत. त्यानुसारच शिर्डी मतदारसंघासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर नगरमधील नगरसेवक सुभाष लोंढे यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमानंतर रात्री उशिरा ही बैठक स्वतंत्रपणे झाली.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या बैठकीस विलंबाने आले. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, पक्षनिरीक्षक आ. शरद रणपिसे, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. भाऊसाहेब कांबळे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता भांगरे, जि. प.चे माजी अध्यक्ष अशोक भांगरे, मधुकर नवले आदी यावेळी उपस्थित होते.
लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी बरोबर आघाडी करूनच लढवली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शिर्डीतील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. बैठकीत इच्छुक उमेदवारांच्या नावांची मात्र कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा केला जातो. बुथ समित्यांचा आढावाही घेण्यात आला.
शिर्डीच्या जागेसाठी पक्षाकडे निवृत्त अधिकारी व कवी लहू कानडे, प्रेमानंद रूपवते यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. याशिवाय पक्षातील काही जण आ. कांबळे यांनाही उमेदवारी करण्यासाठी आग्रह करत आहेत. शिर्डीची जागा काँग्रेसकडे आहे तर, नगरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. परंतु गेली काही महिने या दोन्ही जागांची अदलाबदल होणार याची चर्चा दोन्ही पक्षांत रंगलेली होती, ती सध्या थंडावली होती. परंतु मुख्यमंत्र्यांच्या या संकेतांमुळे ती पुन्हा जोरात सुरब होईल.