राज्यातील विधानसभा निवडणुकीत ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक ठिकाणी फटका बसल्याचे स्पष्ट झाले असल्याने दोन्ही काँग्रेसने यानंतरच्या निवडणुका एकत्र लढण्याचे ठरविले असून नवी मुंबई पालिका निवडणुकीत हा प्रयोग करण्याचे ठरले आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नवी मुंबईतील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी नुकतीच येथील राजकीय सद्य:स्थितीची माहिती घेतली.
नवी मुंबई पालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात होत आहे. त्याची सर्व प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने या निवडणुकीची जबाबदारी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर सोपविली आहे, मात्र राणे यांनी या निवडणुकीच्या व्यूहरचनेला अद्याप सुरुवात केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी मंत्री गणेश नाईक यांच्या राजकीय हालचालींवर अनेक पक्षांच्या पुढील हालचाली अवलंबून आहेत. ते यापूर्वी भाजपमध्ये जाणार अशी चर्चा गेली एक महिना रंगली होती, आता ते शिवसेनेत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी राष्ट्रवादी सोडल्यास काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यास इच्छुक आहे. नाईक राष्ट्रवादीत राहिल्यास त्यांचा आघाडीला पहिल्यापासून विरोध असल्याने ती आघाडी होण्याचा काहीही प्रश्न येणार नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपले निकटवर्तीय माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांच्याशी येथील राजकीय घडामोडीबद्दल नुकतीच माहिती घेतली. यापूर्वी राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसची कधीही स्थानिक पातळीवर आघाडी झालेली नाही.
राज्यात असलेल्या आघाडीला नवी मुंबईत नेहमीच बिघाडीचा सामना करावा लागला आहे. नाईक यांना राजकीयदृष्टय़ा पायचीत करण्यासाठी नवी मुंबईत इतर सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्याचे चित्र असून येत्या पाालिका निवडणुकीत काँग्रेस शिवसेनेबरोबरही छुपी युती करण्यास मागे-पुढे पाहणार नाही. राज्यात झालेल्या पानिपतानंतर काँग्रेसने भविष्यात होणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका आघाडी करून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने चाचपणी सुरू केली आहे.
मतांचे विभाजन टाळण्यासाठी राज्यातील यानंतरच्या निवडणुका दोन्ही काँग्रेसने एकत्र येऊन लढण्याचा निर्णय राज्यपातळीवरील कमिटीने घेतलेला आहे. त्याचबरोबर स्थानिक नेत्यांना त्यांचा निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील राजकीय स्थित्यंतर लक्षात घेऊन काँग्रेस आपली भूमिका ठरविणार आहे.
-दशरथ भगत, अध्यक्ष, नवी मुंबई काँग्रेस
संग्रहित लेख, दिनांक 20th Jan 2015 रोजी प्रकाशित
पालिका निवडणुकीत काँग्रेसचे राष्ट्रवादी बरोबर आघाडीचे प्रयत्न
राज्यातील विधानसभा निवडणुकीत ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक
First published on: 20-01-2015 at 07:42 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress want to coalition with ncp in municipal elections