विठ्ठल रामजी शिदे यांचा प्रामाणिकपणा व निर्भयता मोलाची असून, त्यांनी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेच्या तत्त्वप्रणालीने आर्थिक, सामाजिक लोकशाही बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ते राजकीय व सामाजिक क्षेत्रातील सुधारक असल्याचा गुणगौरव ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांनी केला.
रयत शिक्षण संस्थेच्या कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयतच्या जनरल बॉडीचे सदस्य अॅड. रवींद्र पवार होते. तर रयतचे सचिव डॉ. अरविंद बुरुंगले, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, सरोजाताई पाटील, विठ्ठलराव जाधव, यू. टी. पाटील, अॅड. सदानद चिंगळे, सचिव माधवराव मोहिते, अॅड. सयाजीराव पाटील, भाऊसाहेब देसाई, बाळासाहेब शेरेकर, प्रा. कन्हैया कुंदप यांची उपस्थिती होती.
प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, की विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणासाठी काँग्रेसच्या अधिवेशनात सलग ३२ वष्रे दाद मागूनही न्याय मिळाला नाही. अखेर अॅनी बेझंट यांनी त्यांची धडपड पाहून त्यांचा समावेश विषयक नियामक समितीत केला. त्यानंतर त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य केले. मुंबई येथे सहकुटुंब राहून काबाडकष्ट करून जीवन जगले. सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिल्यानंतर ऑक्सफर्डची डिग्री घेतली. पण नोकरी केली नाही. अभ्यासाच्या व्यासंगाने जीवनात मन व विचारांच्या कक्षा रुंदावत जाऊन त्यांनी प्रार्थना समाजाचे कार्य केले. त्यापुढे ब्राम्हो समाजाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला गेले. त्यांच्या जीवनात महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांचा संपर्क आला होता. अनेक मोठय़ा माणसांच्या तुलनेत त्यांची तुलना होत होती. मोठी माणसे ही मोठी असतात, पण मोठा माणूस हा आपल्या परीने मोठा होत असतो. मात्र, शिंदे यांनी कार्य करूनदेखील त्यांची जीवनात फार मोठी उपेक्षा झाली. त्यांचे जीवन त्यागमय असून, ते काही अपेक्षा न करता खडतर जीवन जगले. समाज एकसंध ठेवण्याचे काम करून दिशा देण्याचे काम केले. अशा मोठय़ा माणसाचा विसर समाजाला पडतो ही शोकांतिका आहे. त्यांच्या स्मृतीचा जागर समाजाने केला पाहिजे असे आवाहन एन. डी. पाटील यांनी केले. रयत शिक्षण संस्थेने शिवाजी विद्यापीठात विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अध्यासनाच्या दृष्टीने आर्थिक मदत दिली. त्यासाठी समाजातून अधिक मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.