दहावीच्या परीक्षेस शनिवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडली. गेल्या २१ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू झाली. मात्र, आजपर्यंत कॉपीचा एकही प्रकार उघडकीस आला नाही. या कॉपीमुक्त अभियानाची फलश्रुती की कॉपीकडे दुर्लक्ष हा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.
सन २००८ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे यांनी जिल्ह्य़ात कॉपीमुक्त अभियान राबविले होते. त्यानंतर सामूहिक कॉपीच्या प्रकाराला बराच आळा बसला होता. मात्र, तरीही अनेक ठिकाणी कॉपीच्या घटना उघडकीस आल्या होत्या. यंदा बारावी परीक्षेत ५० केंद्रांवरून १६ हजार ३७४, तर दहावीत ७५ केंद्रांवरून २६ हजार १३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. बारावीसाठी २५ व दहावीसाठी ३२ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. कॉपी प्रकाराबाबत रोजचा अहवाल निरंक येत असल्याने जिल्ह्य़ात कॉपीमुक्ती अभियान यशस्वी झाले म्हणायचे की विद्यार्थ्यांना कॉपीच करता येत नाही, असे प्रश्न आता समोर येत आहेत.