नागरिकांना आपल्या समस्यांविषयी तक्रार अथवा सूचना एसएमएसद्वारे करता यावी यासाठी मुंबई महापालिकेने ९८७०७९१९१६ क्रमांकाची सेवा १ जानेवारीपासून कार्यरत करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना आपल्या तक्रारी अथवा सूचना करता याव्यात यासाठी महापालिकेने दूरध्वनी क्रमांक १९१६ व १०८ सुरू केले आहेत. तसेच महापालिकेच्या http://www.mcgm.gov.in  या संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर जून २०१२ पासून ९८३३३३१९१६ या मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे तक्रार करण्याची सुविधाही उपलब्ध केली. मात्र या सेवेमध्ये काही तांत्रिक त्रुटी आल्यामुळे नव्या वर्षांत एसएमएसद्वारे तक्रार करण्यासाठी ९८७०७९१९१६ या क्रमांकाची सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. जुना मोबाइल क्रमांक १६ जानेवारी २०१३ रोजी खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे नागरिकांनी नव्या मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे तक्रारी नोंदवाव्यात.