स्वयंभू संस्थान असल्याच्या थाटात कारभार करणाऱ्या कल्याण- डोंबिवली पालिकेच्या शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी निकृष्ट दर्जाच्या व कमी किमतीच्या कंपास पेटी, बूट आणि दप्तरे दामदुपटीने खरेदी केल्याचे उघड झाले आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेच्या सदस्याने हा प्रकार चव्हाटय़ावर आणला.
शिक्षण मंडळातील १७ सदस्य आणि अधिकाऱ्यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे. सर्वपक्षीय शिक्षण मंडळाचे सदस्य हे निकृष्ट साहित्य खरेदी होत असताना काय करीत होते. त्यांना हे निकृष्ट व आर्थिक हेराफेरी केलेले साहित्य दिसले नाही का, असे प्रश्न महासभेत शिवसेना नगरसेवक कैलास शिंदे यांनी उपस्थित केले. पालिकेत सेनेची सत्ता आणि शिक्षण मंडळातही सेनेचा सभापती असताना पक्षाचा शिक्षण मंडळावर वचक नसल्याचा प्रकारही यानिमित्ताने उघड झाला आहे. शिक्षण मंडळ ही आमची स्वतंत्र जहागिरी आहे, अशा अविर्भावात मंडळाचे सदस्य वावरत असतात अशी टीका यानिमित्ताने केली जात आहे. कॅम्लीनच्या  ७५ रुपयांच्या कंपास पेटीवर १०० रुपयांची दरचिठ्ठी चिकटवण्यात आली आहे. ६० रुपयांचे दप्तर २४० रुपयांना खरेदी करण्यात आले आहे. भुक्कड दर्जाचे बूट २४० रुपयांना खरेदी करण्यात आले आहेत. या तिन्ही वस्तू सभागृहात दाखवून शिंदे यांनी शिक्षण मंडळातील अनागोंदी कारभार उघड केला. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. यापुढे शिक्षण मंडळात कोणतेही साहित्य खरेदी करताना तो प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्याचे आदेश महापौर कल्याणी पाटील यांनी दिले. आयुक्त शंकर भिसे यांनी या सर्व गैरप्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
ठोक पगारी लखपती
पालिकेच्या डोंबिवलीतील माध्यमिक शाळेत दोन ठोक पगारी हिंदी विषयाच्या शिक्षकांना गेले वर्षभरात १ लाख ९२ रुपयांचा पगार देण्यात आला आहे. या शिक्षकांची नियुक्ती कोणी केली. त्यांचा पगार कोण काढतो. याविषयी प्रशासनाधिकारी अवारे उत्तर देऊ शकले नाहीत.