जिवंत सभासदांना मृत दाखवून नंदुरबार जिल्हा गव्हर्मेट सर्व्हट बँकेच्या (ग.स.बँक) मयत सभासद कर्जमुक्ती फंडात अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असला तरी मुख्य संशयित सी. एन. देसले आणि आर. वाय. पवार यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. याप्रकरणी संशयितांना तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग. स. बँकेचे माजी अध्यक्ष तथा सभासद रवींद्र खैरनार यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.
बँकेच्या मयत सभासद कर्जमुक्ती निधीतील काही रकमेचा अपहार झाल्याचे उघडकीस आले. जिवंत असलेल्या सभासदांना मृत दाखविण्यात आले असल्याचे खैरनार यांनी निवेदनात म्हटले आहे. बँकेचे सभासद अरुण सोनार यांनी नंदुरबार येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारींची दखल घेऊन न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत देसले व व्यवस्थापक रमेश पवार यांना आरोपी करण्यात आले आहे.
११ डिसेंबर २०१३ रोजी न्यायालयाने चौकशीचा आदेश दिल्यानंतर २० डिसेंबर २०१३ रोजी या संदर्भात प्रत्यक्ष गुन्हा दाखल झाला. या संदर्भातील अहवाल १० फेब्रुवारी २०१४ पर्यंत सादर करावा, असा न्यायालयाचा आदेश असतानाही संशयित देसले व पवार यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. पवार यांनी बँकेच्या व्यवस्थापक पदावर असताना बेकायदेशीर कर्ज वाटप केले. कुठल्याही नियमांचे पालन न करता संगनमताने लाखो रुपयांचा अपहार केला आहे. यानंतर या अपहाराचे कागदोपत्री पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे. पवार यांनी बंकेच्या चाळीसगाव येथील शाखेतही गैरव्यवहार केल्याचा आरोप असून त्यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे. अशी पाश्र्वभूमी असताना संशयितांविरुद्ध कारवाई होत नसल्याने आता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा रवींद्र खैरनार, राजेंद्र पाटील, वसंत चव्हाण, दादा सरोदे , प्रवीण गवळे व दिनेश पाडवी यांच्यासह बँकेच्या सभासदांनी दिला आहे.